
मुंबईसह राज्यात कोरोना नियंत्रणात येत असताना कोरोनाचा अतिजलद संसर्ग करणाऱ्या बीए-4 आणि बीए-5 व्हेरिएंटने सोमवारी मुंबईत शिरकाव केल्यानंतर आज ठाण्यात बीए-5 व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडल्यामुळे मुंबईनंतर आता ठाणेकरांची चिंता वाढली आहे. राज्यात आतापर्यंत बीए-4 आणि बीए-5 च्या रुग्णांची एकूण संख्या 14 वर पोहोचली आहे.
मुंबईसह राज्यात कोरोनाची संख्या नियंत्रणात सोमवारी मुंबईत बीए-4चे तीन आणि बीए-5 चा एक रुग्ण सापडला आहे. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर हे सर्व कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, आज पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार, ठाण्यात बीए-5 व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले आहेत. यातील एक 25 वर्षांची महिला असून दुसरा रुग्ण हा 32 वर्षांचा पुरुष आहे. या दोघांना 28 आणि 30 मे रोजी कोरोना झाला होता. मात्र, होम क्वारंटाईन झाल्यानंतर हे दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत. या दोघांचेही पूर्ण लसीकरण झालेले आहे. या आधी पुण्यात बीए ४ व्हेरिएंटचे ४ तर बीए ५ व्हेरिएंटचे 4 रुग्ण सापडले होते तर मुंबईत सोमवारी बीए-4 व्हेरिएंटचे 3 आणि बीए-5 चा एक रुग्ण सापडला होता.
राज्यापेक्षा मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या अधिक; 19 हजार 575 सक्रिय रुग्ण, दिवसभरात 1724 रुग्ण
मुंबईत सोमवारी 700 ने कमी झालेला कोरोना रुग्णांचा आकडा आज पुन्हा वाढला असून आज दिवसभरात 1 हजार 724 रुग्ण सापडले तर दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. मृत्युमखी पडलेल्या दोन्ही महिला असून त्यांचे वय 60 पेक्षा जास्त होते. रुग्ण दुपटीचा दर कमी होऊन 458 दिवसांवर आला आहे. कोरोनामुक्त होणार्यांची संख्या वाढली असून आज दिवसभरात 1 हजार 240 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, सक्रीय रुग्णांची संख्या 19 हजार 575 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यातही रुग्णसंख्या वाढली असून आज दिवसभरात 2 हजार 956 रुग्ण सापडले तर चार जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 2 हजार 165 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 267 वर पोहोचली आहे.



























































