विरोधकांना आमची भीती वाटते, म्हणून ते आरोप करतात – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aaditya-thackeray

रामजन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेतल्यावर हे पवित्र स्थान असल्याची जाणीव होते. आपण श्रद्धाभावनेने रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहोत, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रामजन्मभूमीला भेट दिल्यावर सांगितले. श्रीरामाचे नाव प्लेटवर लिहिण्याचा क्षण महत्त्वाचा होता. शिवसेनेची अयोध्येबाबतची भूमिका आणि राममंदिरासाठी दिलेला लढा, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका जगजाहीर आहे. त्यामुळे याबाबत अधिक सांगण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.

देशातील प्रत्येक नागरिकाची आस्था या भूमीशी जोडलेली आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या लढ्यानंतर आता मंदिर निर्माण होत असताना या स्थानाला भेट देणे हा आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. राममंदिर लढा आणि मंदिर उभारणीत शिवसेनेचे योगदान काय आहे, हे आम्हाला आणि जनतेला चांगले माहिती आहे. त्यामुळे विरोधक करत असलेल्या आरोपांना महत्त्व देण्याची गरज नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आता संघर्ष, लढा संपलेला आहे, त्यामुळे आम्ही दर्शन आणि आशिर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत. विरोधकांना आमची भीती वाटते, त्यातूनच ते आरोप करत आहेत. मात्र, हा श्रद्धेचा विषय आहे, राजकारणाचा नाही. आमचे हिंदुत्व जगजाहीर आहे. त्यामुळे या राजकारणात न पडता आम्ही आमचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लक्ष्मण किला किंवा हनुमान गढीत आमचे अगत्याने, प्रेमाने, आपुलकीने स्वागत करण्यात येते. यात श्रद्धेची आणि आपुलकीची भावना आहे. हेच संबंध जपण्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही येथे येत असतो. मंदिराचे मॉडेल पाहिल्यावर या ठिकाणी भव्यदिव्य मंदिर उभे राहणार असल्याचे दिसते. महाराष्ट्रातील अभियंतेही यासाठी काम करत आहेत. मंदिराच्या निर्माणासाठी काम करणे हे भाग्याचे काम आहे. हा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला, त्यात सहभागी होता आले, हे आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.