
मुंबईच्या गोलंदाजांनी उत्तर प्रदेश संघाचा पहिला डाव केवळ 180 धावांतच गुंडाळला आणि दुसऱ्या डावात 1 बाद 133 अशी दमदार मजल मारत तिसऱया दिवसअखेर 346 धावांची निर्णायक आघाडी घेतली. आणि लढतीवर भक्कम पकड मिळवली. मुंबईच्या दुसऱया डावात कर्णधार पृथ्वी शॉची बॅट तळपली. त्याने 71 चेंडूंत 64 धावांची वेगवान खेळी करीत मुंबईला उत्साहवर्धक सुरुवात करून दिली. पहिल्या डावात मुंबईला 213 धावांची मोठी आघाडी मिळाल्याने या लढतीवर मुंबईचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. मुंबईने या पाचदिवसीय लढतीत पहिल्या डावात मोठी आघाडी घेतल्यावर आपल्या दुसऱया डावात वेगवान खेळ करीत 42 षटकांतच 1 बाद 133 अशी जोरदार मजल मारली. तिसऱ्या दिवसअखेर यशस्वी जैसवाल नाबाद 35 आणि अरमान जाफर नाबाद 32 ही मुंबईची जोडी मैदानात होती.
आईचा दम खाऊनही तामोरेने करून दाखवले
मुंबईच्या पहिल्या डावात 115 धावांची झुंझार खेळी करणाऱ्या यष्टिरक्षक हार्दिक तामोरेला शाळेत कमी गुण मिळाल्यामुळे अनेकदा आईचा सज्जड दम मिळायचा. पण त्यातूनही त्याने आपले क्रिकेटचे वेड जपले आणि रणजी लढतीत मुंबईकडून संधी मिळताच दमदार शतक साकारण्याचा पराक्रम केला आहे. पाचवीत असताना त्याच्या प्रशिक्षकांनी आणि पालकांनी त्याला क्रिकेट आणि शिक्षण दोन्हीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मुंबईकडून खेळण्यासाठी त्याला 127 किलो मीटरचा प्रवास करावा लागायचा. अखेर मुलाची आवड आणि गुण लक्षात घेऊन हार्दिकचे वडील जितू तामोरे यांनी माहीममध्ये भाडय़ाने घर घेतले आणि हार्दिकने वडिलांच्या या निर्णयाचे सोने केले.






















































