पंतप्रधानांना दहा लाख ई-मेल, एक लाख पोस्टकार्ड पाठवून नाराजी कळविणार; पाथर्डीतील मुंडे समर्थक आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या अंतर्गत राजकारणात माजी मंत्री पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलले जात असल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील मुंडे समर्थकांनी आता भाजपातच राहून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विरोध करायचा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारसंघात मुंडे यांचा मोठा पगडा आहे, त्या मतदारसंघातून पंतप्रधान कार्यालयाला दहा लाख मेल व एक लाख पोस्टकार्ड पाठवून आपल्या दुखावलेल्या भावना कळवल्या जाणार आहेत. यासाठी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण व त्यांच्या सहकाऱयांनी पुढाकार घेतला आहे.

सुभाष केकाण म्हणाले, पंकजा मुंडे यांचा प्रभाव राज्यातील बीड जिल्हा व पाथर्डी तालुका, नाशिक जिह्यातील येवला, सिन्नर, मनमाड यांसह राज्यातील जवळपास 78 मतदारसंघांत आहे. विधानसभा व लोकसभा निवडणूक लागली की या मतदारसंघात भाजपच्या वतीने पंकजा मुंडेंची सभा आवर्जून ठेवली जाते. त्यामुळे या मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या पारडय़ात मते पडतात. मात्र, सत्ता आली की मुंडे यांना डावलले जाते.

गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून पक्षनेतृत्वाने फडणवीस यांचे नाव जाहीर केले असतानाही पंकजा मुंडे यांनी संपूर्ण राज्यात संघर्षयात्रा काढली. त्यामुळे राज्यात भाजपाची सत्ता आली. या यात्रेदरम्यान ‘कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली’ अशा घोषणा पंकजा मुंडे समर्थकांनी दिल्या. यामुळे दुखावलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना सातत्याने डावलले. विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलून एक वर्ष देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहायक असलेल्या श्रीकांत भारती व राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली.

भाजप नेत्यांना जाहीरपणे जाब विचारणार
मुंडे यांचे कार्यकर्ते असलेल्यांना पंकजा मुंडे यांना विश्वासात न घेता केंद्रात मंत्रिपद देऊन पंकजा मुंडेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या मतदारसंघात मुंडेंचा प्रभाव आहे, त्या मतदारसंघात आता भाजपचे नेते आले, तर त्यांना आम्ही जाहीरपणे जाब विचारणार आहोत. सोशल मीडियाचा आधार घेत आमच्या भावना त्यांना कळणार असल्याचे केकाण म्हणाले.