राधानगरीत जिवंत घोरपडीसह एकाला अटक, वनविभागाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राधानगरी तालुक्यातील फराळे वन तपासणी नाका येथे जिवंत घोरपड पकडून घरी नेत असल्याप्रकरणी वन विभागाकडून शनिवारी एकाला अटक करण्यात आली आहे. रजेनाल हालेस डिसोजा (43) रा. काळम्मावाडी वसाहत बाचणी, ता. कागल, जि. कोल्हापुर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

फराळे गावच्या हद्दीत राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील जंगलातुन रजेनाल डिसोजा पिशवीतुन जिवंत घोरपड अवैधरित्या पकडून घरी घेऊन जात होता. याबाबतची माहिती वनविभागास मिळाली असता वनविभागाच्या पथकाने त्याची चौकशी करुन तत्काळ आरोपीस व जिवंत घोरपडीस ताब्यात घेतले. तसेच वन्यप्राणी घोरपड ही संरक्षित प्राणी असल्याने वनविभागाने गुन्हा नोंद करून आरोपीस अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या जिवंत घोरपडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सदरची घोरपड तंदुरुस्त असुन नियमानुसार वनअधिवासात तिला सुखरुप सोडणार असल्याचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांनी सांगितले. आरोपी डिसोजाकडे पासपोर्ट सापडला असुन तो दुबईला जावुन आल्याचे समजते. तो जिवंत घोरपड विक्री करत असल्याबाबतची माहितीही समोर आली असुन त्याचे अन्य कोणी साथिदार तसेच विदेशी कनेक्शन आहे का याचा तपास सुरु आहे. अजुन काही नावे समोर येतात का याचा तपास सुरू असल्याची माहिती माळी यांनी दिली.

सदरची कारवाई ही संजय वसंत कांबळे वनपाल वन्यजीव राधानगरी, तेजस्विनी पोवार वनरक्षक (वन्यजीव) फराळे तपासणी नाका, भैरवनाथ नारायण यादव वनरक्षक वन्यजीव निदानखण यांनी केली. पुढील तपास विशाल माळी यांचे मार्गदर्शनानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस.पाटील, वनक्षेत्रपाल (वन्यजीव) राधानगरी, अतिरीक्त कार्यभार सहाय्यक वनसरक्षक (वन्यजीव) राधानगरी, वनपाल संजय वसंत कांबळे, भैरवनाथ नारायण यादव वनरक्षक वन्यजीव निदानखण, तेजस्वीनी संभाजी पोवार वनरक्षक हे करत आहेत.