
राज्यात एक लाख लोकांमागे सरासरी 35 जणांचा सर्पदंश झाल्याची आकडेवारी आहे. यातील अनेकांना वेळेवर संर्पदंशविरोधी प्रतिविषाचे इंजेक्शन मिळत नसल्याने मृत्यू ओढवतो. त्यामुळे हाफकिन महामंडळाने ‘सर्पदंशविरोधी संजीवनी किट’ तयार केले आहेत. राज्याच्या प्रत्येक जिह्यात या किटचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना दिलासा मिळणार आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अलीकडेच हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला भेट दिली. तेव्हा त्यांनी विविध विषयांवर व प्रकल्पांवर चर्चा केली. त्यात प्रामुख्याने ‘सर्पदंशविरोधी संजीवनी’ योजनेवर प्रामुख्याने चर्चा झाली. राज्याच्या ग्रामीण भागात मुख्यत्वे घरांमध्ये, शेतीची कामे करताना सर्पदंशामुळे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. हिंदुस्थानात दरवर्षी अडीच लाख लोकांना सर्पदंश होतो, पण अनेकदा सर्पदंशाच्या मृत्यूची नोंद होत नाही. गावापासून रुग्णालये असल्याने सर्पदंशाच्या रुग्णाला प्रत्यक्षात रुग्णालयात नेईपर्यंत बराच वेळ लागत असल्याने मृत्यू ओढवतो.
उपचारांअभावी 60 टक्के मृत्यू
सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने 60 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्पदंशानंतर पहिल्या एक तासात म्हणजे ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यू होतात. या वेळेत रुग्णाला सर्पदंश प्रतिविष मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचतो.
कोरोना लसीचे उत्पादन
कोरोनाचे संकट लक्षात घेऊन हाफकिन महामंडळामध्ये ‘बीएसएल थ्री लॅब’ उभारण्याचा आढावाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. या ‘बीएसएल थ्री लॅब’च्या माध्यमातून कोरोना लसीचे उत्पादन करण्यात येईल. भविष्यात कोणत्याही प्रकारच्या विषाणूचे संक्रमण झाले तरी या लसींचा उपयोग होईल.
सर्पदंशाची राज्यातील आकडेवारी
– महाराष्ट्रात 2018-19 मध्ये सर्पदंशाच्या 42 हजार 26 केसेसची नोंद झाली. देशातील सर्पदंशाची ही सर्वात मोठी संख्या आहे. – महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे 35 लोकांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. – महाराष्ट्रातील पश्चिम घाटाचा परिसर भौगोलिकदृष्टय़ा सर्पांसाठी अनुकूल प्रदेश महणून ओळखला जातो. त्यामुळे या भागात सर्पदंशाच्या घटना अधिक घडत असल्याची नोंद आहे.
संजीवनी किट
सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी हाफकिन महामंडळाने सर्पदंशविरोधी संजीवनी किट (अॅण्टी स्नेक व्हेरम सिरम) तयार केले आहेत. या किटमुळे रुग्णाला तत्काळ प्रथमोपचार मिळणार आहेत. या बॉक्समध्ये सर्पदंशावरील औषध, सीरिंज, ऑइनमेंट, बॅण्डेज, कापूस, धाग्याची आवळपट्टी आणि औषधोपचार कसे करायचे याच्या सूचना असलेले पुस्तक आहे. सर्पदंश प्रतिविष इंजेक्शन डॉक्टरमार्फत दिले जाते, पण ग्रामीण भागात डॉक्टर्स नसल्याने निर्माण होणाऱया अडचणी लक्षात घेऊन पॅरामेडिकल कर्मचाऱयांनाही संर्पदंश प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे किट राज्याच्या ग्रामीण भागात वितरित करण्यात येतील. त्याची सुरुवात जालना जिह्यातून होईल.






























































