
5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील पूर्व भागात शनिवारी दुपारी घडली आहे. या घटनेतील नराधमाला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. किशोर उर्फ केश्या विजय पवार (रा. आरडगाव, ता. राहुरी) असे नराधमाचे नाव आहे.
आरोपी किशोर पवार याने पाचवर्षीय बालिकेला तिच्या घरातून उचलून परिसरातील शेतात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातून बेपत्ता झालेल्या आपल्या मुलीचा परिसरात शोध घेत असलेल्या आईने ही घटना पाहिल्याने तिने पवार याला जागेवरच पकडून आरडाओरड केली. दरम्यान, पीडित बालिकेचे वडील घटनास्थळी येत असल्याचे दिसताच तो पीडित बालिकेच्या आईला धक्का देऊन घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेनंतर पीडित बालिकेला उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. देवरे, राहुरीचे उपनिरीक्षक नीरज बोकील, सज्जन नारेडा यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस पथकाने रविवारी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून नराधम किशोर पवार याच्याविरोधात अपहरण, बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारेडा तपास करीत आहेत.
























































