
चंद्रकांत पालकर, पुणे
ज्येष्ठ, आषाढ महीना लागताच सर्वांना विठुमाऊलीच्या दर्शनाची ओढ लागते. पंढरपुरात विठुरायाला भेटण्यासाठी देहू – आळंदी येथून पालख्यांचे प्रस्थान होते. या भक्तिमय वातावरणाचे औचित्य साधून आज पुण्याच्या टिळक रोड वरील डी.ई. एस.पूर्व प्राथमिक शाळेच्या वतीने छोट्या वारकऱ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेमधे दिंडीत सहभागी झाले होते. या दिंडीत मुलांनी आपल्यासोबत तुळशी वृंदावन, पालख्या आणल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांनी कापडी पिशव्या, हातरूमाल गोळा करून वारकऱ्यांना भेट स्वरूपात दिले. या छोट्या वारकऱ्यांनी यंदा वारीमधुन पर्यावरण वाचवा असा संदेश दिला.

या दिंडीची सुरुवात होताच शाळेचा परिसर अभंगाच्या सूरांनी भरला होता. ही छोट्या वारकऱ्यांची दिंडी विठुनामाच्या घोषात शाळेजवळील विठ्ठल मंदिरात गेली. तेथून ही दिंडी परत शाळेत आल्यावर विठोबाची आरती झाली. यावेळी गोड शिरा प्रसाद म्हणुन वाटला. हा सोहळा शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून पार पडला.






























































