
दुकानांवरील पाटय़ा मराठी करण्यासाठी व्यापाऱयांनी मागितलेली सहा महिन्यांच्या मुदतवाढीची मागणी पालिकेने फेटाळली आहे. त्यामुळे मुंबईतील दुकाने व आस्थापनांवरील नामफलक ठळक मराठी अक्षरांत नसल्यास जुलैपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे आज अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी सांगितले. दुकानावरील पाटय़ा मराठी करण्यासाठी पालिकेने दिलेली 31 मेपर्यंतची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली होती.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मार्च 2022 ला दुकाने, आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी 2018 च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांवर मराठी पाटय़ा असणे बंधनकारक होते. मात्र, नव्या नियमानुसार कर्मचाऱयांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मद्यविक्रेत्या दुकानांनाही आता महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. याबाबतची कार्यवाही करण्यासाठीदेखील 30 जूनपर्यंतची मुदत राहणार आहे.
अशी होणार कारवाई
मुंबईत मराठी नामफलक लावण्याची कार्यवाही होत असल्याबाबतची तपासणी पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी 75 इन्स्पेक्टरची व्यवस्था आहे. त्यांच्यासोबत एक सुविधाकारही राहील.
या तपासणीत मराठी पाटी लावण्यास नकार दिल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाईल. न्यायालयीन कारवाई नको असल्यास दंड भरावा लागेल. यामध्ये एका कामगारामागे दोन हजार रुपयांचा दंड न्यायालयीन कारवाईनंतर वसूल केला जाईल.
पाच लाख दुकाने-आस्थापनांना बंधनकारक
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम, 2022 मधील कलम 36 ‘क’ (1)च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनेला लागू असलेल्या कलम 7 नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने-आस्थापना आहेत. या सर्वांना हा नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.






























































