
चेंबूरमध्ये आज दुपारी कंपाऊंडची भिंत कोसळून झालेल्या अपघातात 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले. वन जमिनीवर ही भिंत आहे.
चेंबूरमध्ये घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर असलेल्या जय अंबेनगर झोपडपट्टीवर आज दुपारी पावणेदोनच्या सुमाराला वन जमिनीवरील कंपाऊंडची भिंत कोसळली. यात नैना धोत्रे (3), शांताबाई धोत्रे (50) आणि रमेश पवार (33) हे जखमी झाले.
तिघांनाही तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नैना हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर शांताबाई धोत्रे यांना उपचारानंतर डिस्चार्ज दिला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर रमेश यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राजावाडी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सचिन यांनी दिली.




























































