
लॉकडाऊननंतर मध्य रेल्वेने आपल्या सर्व मेल-एक्प्रेस-सुपरफास्ट रेल्वेगाडय़ांची अनारक्षित (जनरल) तिकिटांची विक्री 29 जूनपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ज्या प्रवाशांची तिकिटे वेटिंगमध्ये आहेत त्यांना आयत्या वेळी जनरल तिकीट काढून प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच प्रवाशांना आता कोणत्याही तिकीट काऊंटर आणि यूटीएस ऍपवरूनही अनारक्षित तिकीट काढता येणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे.
कोरोनाची लाट सुरू झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने आपल्या सर्व प्रकारच्या मेल-एक्स्प्रेसची अनारक्षित तिकीट विक्री बंद करीत केवळ आरक्षित तिकिटांच्या ट्रेन चालू ठेवल्या होत्या. कोरोनाच्या निर्बंधामुळे प्रवाशांना कोरोनाचे सर्व नियम पाळून आरक्षित तिकिटांच्या आधारेच प्रवास करता येत होता. मेल-एक्प्रेसच्या आरक्षित तिकीट काढण्याचा 120 दिवसांचा ‘ऍडव्हान्स रिझर्व्ह पीरियड’ 29 जून रोजी संपत आहे. त्यामुळे 29 जूनपासून मध्य रेल्वेच्या सर्व मेल एक्प्रेस रेल्वेगाडय़ांची अनारक्षित जनरल तिकिटे विक्री सुरू होत असून सर्व एटीव्हीएम, जेटीबीएस मशीन, अनारक्षित तिकीट काऊंटर व यूटीएस ऍपद्वारे अनारक्षित (जनरल) तिकिटांची बुकिंग पुन्हा सुरू होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.























































