
कोणत्याही परिस्थितीत संयमी राहणे, ही काँग्रेची शिकवण आहे. त्यामुळेच मी थकलेलो नाही. माझ्यात कोणताही तणाव नाही. आता तुम्ही दिवसभर 11 तास चौकशी केली. आणखी 10 तास सलग चौकशी करा, असे आव्हानाचे उत्तर राहुल गांधी यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिले. याबाबतचा किस्सा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितला. यावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.
नॅशनल हेरॉल्डप्रकरणी राहुल गांधी यांची ईडीने आतापर्यंत 5 दिवसांत तब्बल 40 तास चौकशी केली. मात्र, राहुल गांधी यांनी चौकशीत नेमके काय प्रश्न विचारले आणि त्याला काय उत्तरे दिली, याचा उल्लेख केला नव्हता. मात्र, आज राहुल गांधी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचे मनोधैर्य वाढवले. दरम्यान, एका छोट्या खोलीत ईडीच्या तीन अधिकाऱ्यांनी माझी चौकशी केली. चौकशीवेळी माझ्याबरोबर काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता होता. त्यामुळे मला कितीही प्रश्न विचारले तरीही काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी कधीच डगमगलो नाही. मी काय पण काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर दबाव आणून त्याची मुस्कटदाबी करता येणार नाही, हे ईडीच्या अधिकाऱ्यांनाही कळून चुकले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
सोनिया गांधी यांनी मागितली मुदत
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही नॅशनल हेरॉल्डप्रकरणी ईडीने गुरुवारी 23 जूनला चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, गुरुवारी त्यांना ईडीसमोर येणे शक्य नसल्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागितली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना आणि फुफ्फुसाला संसर्ग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती चांगली असली घरी आराम करत आहेत. मात्र, अजूनही त्या यातून पूर्णपूणे बऱ्या झालेल्या नाहीत. त्यामुळे ईडीसमोर हजर राहण्यासाठी त्यांना आणखी काही आठवड्यांची मुदत द्यावी, अशी मागणी सोनिया गांधी यांच्यावतीने काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी टि्वट करत केली आहे.


























































