आज गेलात तर उद्या संपून जाल! आमदार नितीन देशमुख यांचा बंडखोरांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपची खेळी नीट समजून घ्या नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. आज त्यांच्याबरोबर गेलात तर उद्या संपून जाल, असा इशारा शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. दरम्यान, बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांच्या ठरावावरही मी सही केलेली नाही, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना आमदारांना फसवून महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कसे नेले गेले त्याचा घटनाक्रम नितीन देशमुख यांनी माध्यमांना सांगितला. ते म्हणाले, राज्यमंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्याशी चर्चा करून गाडीत बसलो. मात्र, गाडी 100 किलोमीटरवर असलेल्या गुजरातच्या दिशेने निघाली होती, हे माझ्या नंतर लक्षात आले. दरम्यानच्या काळात प्रवासादरम्यान धाराशीवचे आमदार कैलास पळाल्याचे समजले. माझ्या बाजूला नंतर इतर आमदार येऊन बसले होते. त्यामुळे मला पळायला मिळाले नाही. गाडी हॉटेलमध्ये पोहोचली. तिथे मोठा पोलीस बंदोबस्त होता. भाजपची मंडळी तिथे होती. एकनाथ शिंदे यांचे नाव दिसत असले तरी या मागे भाजपचे षड्यंत्र आहे, असेही देशमुख म्हणाले.

गुजरात पोलिसांना माझा घात करायचा होता

गुजरातच्या शंभर ते दीडशे पोलिसांचा माझ्यावर पहारा होता. पोलिसांनी मला बळजबरीने रुग्णालयात नेले, तेथे मला बळजबरी इंजेक्शन दिले. रुग्णालयामध्ये नेल्यावर 20-25 लोकांनी पकडून मला इंजेक्शन दिले. ते इंजेक्शन कशाचे होते, याची मला माहिती नाही. रुग्णालयातून मी पळून रात्री रस्त्यावर आलो. माझ्या मागावर दीडशे पोलीस होते. गुजरात पोलिसांना माझा घात करायचा होता, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला.