ठसा – मधुकर दरेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नवनाथ दांडेकर

कोरोना महामारीच्या भीषण संकटातही आपल्या शिष्यांना आणि युवकांना व्यायाम, योगा आणि आसनांची प्रात्यक्षिके ऑनलाइन करायला लावणारे व्यायाममहर्षी मधुकर दरेकर सर आज (25 जून) 83व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या वयातही त्याची शरीरयष्टी आणि उत्साह एखाद्या विशीतल्या तरुणालाही लाजवणारा आहे. ते पहाटे उठून काही तास व्यायाम आणि योगासने करतात. व्यायामशाळेत जाऊन शिष्यांना व्यायाम, वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंगचे प्रशिक्षण उत्साहाने देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक शरीरसौष्ठवपटू, वेटलिफ्टर आणि पॉवरलिफ्टर्स मुंबईला, राज्याला आणि देशाला पदके मिळवून देत आहेत. गेली 58 वर्षे दरेकर व्यायाम, वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात अव्याहतपणे कार्यरत आहेत. या काळात खेळाडू, संघटक, पंच, प्रशिक्षक. प्रशासक आणि मार्गदर्शक अशा विविध भूमिका त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी मधुकर दरेकर कोकणातील कशेडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथून शिक्षण आणि करीअर घडवण्यासाठी मुंबईला आले. तिथे त्यांनी परळच्या सोशल सर्व्हिस लीगमधून व्यायामाचे धडे गिरवले. व्यायामाने शरीर कमावल्यावर त्यांनी मुंबईतील ग्लॅक्सो लॅबोरेटरीजमध्ये 34 वर्षे नोकरी केली. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेत व्यायाम आणि पॉवरलिफ्टिंग क्षेत्रासाठी स्वतःला वाहून घेतले. नोकरी आणि निवृत्तीनंतरच्या कालावधीत दरेकर सरांनी सोशल सर्व्हिस लीगमध्ये 34 वर्षे, कामगार क्रीडा भवनात (एल्फिन्स्टन) 12 वर्षे ,चेंबूरच्या पवनपुत्र व्यायाम मंदिरात 12 वर्षे, वांद्रे फिजिकल असोसिएशनमध्ये 20 वर्षे तसेच गोरेगावच्या करमरकर हेल्थ स्पामध्ये सहा वर्षे युवा व्यायामपटू आणि शरीरसौष्ठवपटूंना निरपेक्ष वृत्तीने प्रशिक्षण दिले .त्यानंतर त्यांनी चैतन्य हेल्थ केअर सेंटर (गोरेगाव, पश्चिम) येथे आजतागायत व्यायाम, वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग प्रशिक्षणाचे कार्य सुरू ठेवले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतून व्यायामपटू, वेटलिफ्टर्स आणि पॉवरलिफ्टर्स घडवण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे जनक म्हणून दरेकर सरांचे नाव आदराने घेतले जाते. 1983 मध्ये प्रथमच महिलांना व्यायाम, पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग प्रशिक्षण देण्याचा उपक्रम दरेकर सरांनी आग्रहाने सुरू केला. त्याचेच फलित म्हणून आज अनेक युवा महिला वेटलिफ्टर्स आणि पॉवरलिफ्टर्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत महाराष्ट्र आणि देशाचे नाव उज्ज्वल करताना दिसत आहेत. वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग खेळाडू म्हणून दरेकर यांची ख्याती मोठी आहे. 18 ऑक्टोबर 1964 मध्ये त्यांनी राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करीत 1964 ते 1986 या कालावधीत वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग स्पर्धांत एकूण 9 सुवर्णपदके पटकावली. संघटक आणि प्रशासक म्हणूनही दरेकर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. राज्य पॉवरलिफ्टिंग संघटनेचे ते 21 वर्षे अध्यक्ष होते. सध्या पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सीईओ म्हणून ते कार्यरत आहेत याशिवाय दि पॅरालिम्पिक असोसिएशन मुंबईचे मानद सल्लागार आणि सिंधुदुर्ग, गोवा पॉवरलिफ्टिंग संघटनेचे सल्लागार म्हणूनही ते काम पाहत आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी आणि राज्यासाठी वेटलिफ्टर्स आणि पॉवरलिफ्टर्स घडवण्याची भीष्मप्रतिज्ञा सरांनी केली आहे. आता महानगरपालिका शाळांतील मुलांना व्यायाम आणि वेटलिफ्टिंगचे मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम त्यांना राबवायचा आहे. या प्रशिक्षणासाठी महापालिका अथवा महाराष्ट्र शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी असे साकडे त्यांनी महापालिका प्रशासनाला घातले आहे. दरेकर सरांनी वयाचे शतक पूर्ण करावे आणि हुन्नरी व समर्थ खेळाडू मोठय़ा संख्येने घडवावेत.