मुखवटे सोलताना – प्लॅस्टिक युग आणि आपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

हल्ली हसू पण प्लॅस्टिकसारखं नकली झालंय… जीवन पण… नुसतंच दिखाऊ रंगीत. पण शांती-समाधान नाही. तांबूस पिंपळपान… रंगीत फुलं… रिमझिम पाऊस हे पाहण्याचा आनंद नाही होत कुणाला… जगण्याची जत्रा… यात यात्रेतला आनंद कुठून येणार?

समुद्रात आणि चक्क अंटार्क्टिकाच्या बर्फाळ, सर्वात अति थंड ठिकाणी प्लॅस्टिक सापडलंय ही बातमी धोक्याची घंटा आहे, असंही कुणाला वाटत नाही, हे आणखीनच भयप्रद.

जैवविविध संपत्तीबाबत आपण प्रचंड श्रीमंत आहोत. कदाचित म्हणूनच आपण इतके बेपर्वा झालोय. लाल समुद्र, मृत सागर, उपसागर, असंख्य नद्या दरवर्षी येणाऱया अमृतधारा किती घेशील दो कराने इतका कोसळून आपण आटवत खराब केलेल्या समुद्र, नद्यांत आणखी भर टाकून ताजं स्वच्छ पाणी देतो – आपण न सुधारणारे! पुनःश्च त्यात रसायन, कचरा, प्लॅस्टिक टाकून ते खराब करतो. प्लॅस्टिकचं विघटन होत नाही म्हणे. विघटन होताना निर्माण होणारा कार्बन हवेलाही आणखी विषारी करतो. जेवढी जगात माणसांची लोकसंख्या वाढत नाही तितक्या वेगाने प्लॅस्टिकची वेगवेगळी रूपं जन्म घेतात. पुन्हा ते आपल्यापेक्षा जास्त चिरंजीव!

काही दिवसांनी आपल्या पेशी पण हळूहळू प्लॅस्टिकच्या होतील. मग इंद्रियं – मग त्वचा. हळूहळू आपण पण अख्खेच्या अख्खे प्लॅस्टिकचे होऊ! यातल्या विदारक अतिशयोक्तीचा भाग सोडला तर शास्त्रीय सत्य असं आहे की, ज्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, जार, बाऊल, कंटेनर, मग्ज, कप, भांडी याचा आपण सर्रास वापर करतो – अन्न, पाणी, भाज्या, सॉसेस… कुठलीही गोष्ट हळूहळू वापरानं झिजते तद्वत यातील प्लॅस्टिकचे सुक्ष्म कण त्या अन्नात, पाण्यात, सॉसेस, भाज्यांमध्ये मिसळून आपल्या शरीरात प्रवेश करतात! आणि ते घाम मलमूत्र याद्वारे बाहेर पडत नाही आणि मायक्रोवेव्हमध्ये शिजवलं तर त्याचे आणि किती वाईट परिणाम होतात हे अजून शास्त्रज्ञांनी वा डॉक्टरांनी सांगितलं नाही, पण हल्ली शंभरात पंच्याहत्तर टक्के लोकांना कॅन्सर होतो!

पूर्वी लोक घरातच जेवायचे! तेही तांब्यापितळेची भांडी वापरत. मातीची भांडी, काशाची. पूर्वी प्लॅस्टिकचा वापर जवळपास नव्हताच. त्यामुळे पॅन्सरही नव्हता. आर्युमर्यादाही जास्त. नव्वद-शंभरी गाठणारे लोकच होते. त्याला कारण जितकी घातक जीवनशैली, बैठी वा चंगळवादी, जंकफूडवाली आहे तितकीच प्लॅस्टिकमय जीवनपद्धतीही आहेच!

प्लॅस्टिकचं उच्चाटन आपण करू शकत नाही. पण प्लॅस्टिक न वापरता आपण जास्तीत जास्त स्टिल, काच, माती, पितळ, तांबे याकडे गेलो व त्यांचा वापर केला तर आपलं आरोग्य व समाजजीवन व पर्यावरण तिन्ही सुधारेल.

चंद्र, शुक्र, मंगळ यांना वेठीला धरून तिथल्या दगडधोंडे, माती मसण यावर पैसे भरमसाट खर्च करण्याऐवजी प्लॅस्टिकचं विघटन पर्यावरणाला धक्का न लावता कसं करावं यावर जर खर्च केला तर बरं होईल, असा एक वैधानिक सल्ला!

नपेक्षा विघटन करताना पुन्हा कार्बनचं उत्सर्जन होण्याचा धोका पत्करण्यापेक्षा एवढी यानं इथं तिथं पाठवतायत तर मंगळ, गुरू, बुध, नेपच्यून यावर तो प्लॅस्टिकचा कचरा ठेवून द्यावा. तिथलं वातावरण त्याचं काय करायचं ते करेल. तिथं काही सजीव माणसं नाहीत!

दुसरं महत्त्वाचं म्हणजे समुद्रात प्लॅस्टिकचे कण माशांच्या पोटात जाऊन ते मासे आपल्या पोटात म्हणजे परत प्लॅस्टिक आपल्या शरीरात! तर जसं समुद्राचं खारं पाणी गोड पाण्यात रूपांतर करण्याचे प्रयोग होतात तसं प्रत्येक देशानं, प्रत्येक प्रांतात वा गावात असा एकतरी तलाव वा समुद्र राखीव ठेवावा की त्यात कुठलंच रसायन वा कचरा सोडला जाणार नाही. फक्त मासे, प्रवाळ, समुद्री जीव वनस्पती असतील. जसं गणेश मूर्ती बुडवायला राखीव पाण्याची पुंडं ठेवली आहेत. तसंच फक्त स्वच्छ पाण्याचे तलाव, अगदी समुद्रही राखीव ठेवावेत. अलबत समुद्रातही हद्दी आखाव्यात. तेलाची जहाजं पण नकोत… कारण ती बुडली तर परत तेलच तेल पाण्यात. न् ते वेगळं होत नाही. सध्या प्रचंड इंधनटंचाई आहे म्हणे. प्लॅस्टिकपासून वीज आणि इंधन तयार करता येईल का ते पण पहा जरा… बाकी आपलं भस्मासुरासारखंच झालंय थोडक्यात. वर दिल्याबरोबर भस्मासुर जो पाठी लागला तो लागलाच. तसं आपणच शोधलेलं, निर्माण केलेलं बूमरँग होऊन आपल्याच जीविताला हानी करू लागलंय!

बरं यात ‘असून अडचण नसून खोळंबा’ असंही नाहीय. पर्याय आहेत, पण आपल्याला नेमपं काय मिळालं की आपण निरामय राहू हेच कळेनासं झालंय! म्हणजे कुणी म्हणतं, योगा करा की मस्त राहू. कुणी म्हणते, लाफ्टर क्लबमध्ये जाऊन हसा की मस्त राहील. लोक जमून जमून पाका&त जाऊन मोठय़ांदा हसतात. का तर त्यानं आरोग्य चांगलं राहतं म्हणे! खरं तर अशा खोटय़ा खोटय़ा हसण्यापेक्षा जेव्हा आपल्याला प्रसंगानुरूप खदखदा हसू येतं तेव्हा आपल्या मेंदूतल्या नर्व्हज् सिस्टिम पण उत्तेजित होऊन ‘डोपामाईन’ नावाचं संप्रेरक तयार होऊन आपल्याला छान वाटतं आणि त्यातच जोरात हसण्यानं किमान 36 स्नायू कार्यरत होतात. म्हणजे मन, विचार, इंद्रिय इ. ठिकाणी आपल्या संवेदना जागृत होतात आणि त्याचमुळं हसण्यानं ‘त्या हसण्यानं’ आपलं आरोग्य निरामय होऊ शकतं.

हल्ली हसू पण प्लॅस्टिकसारखं नकली झालंय… जीवन पण… नुसतंच दिखाऊ रंगीत. पण शांती-समाधान नाही. तांबूस पिंपळपान… रंगीत फुलं… रिमझिम पाऊस हे पाहण्याचा आनंद नाही होत कुणाला… जगण्याची जत्रा… यात यात्रेतला आनंद कुठून येणार?

– [email protected]