जैव संकेत – जीवन ऐसे नाव…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. श्री. दे. नाईक

हा लेख तुमच्या हाती येईपर्यंत बहुतेक पावसाला सुरुवात झालेली असेल. पूर्वी ‘नेमेचि’ येणारा पाऊस मृग नक्षत्राला चकवा देऊन दडी मारून बसतो हे सुमारे दशकभर अनुभवाला येत आहे. प्रदूषण आणि ‘क्लायमेट चेंज’ वगैरे गोष्टी याला जबाबदार असल्या तरी त्यावर त्वरित उपाय सापडणं कठीण. त्यामुळे आरोग्याबाबतही नित्यनवे प्रश्न उभे राहत आहेत. यावेळच्या असाधारण उन्हाळय़ामुळे अगदी तरुणांपैकी अनेकांना नेत्रदाहाचा त्रास झाला. आता पाऊस शेतीसाठी चांगला व्हावा आणि या वर्षा ऋतूमध्ये सर्वांचं आरोग्यही चांगलं राहावं. तरच पाऊसपाणी ‘एन्जॉय’ करता येईल.

आपला पाण्याशी संबंध गर्भात असताना येतो. जन्मापूर्वी सुमारे तीस आठवडे आपण गर्भजलातच विहरत असतो. असं जलमय वातावरण अनुभवलेल्या मानवी जीवनात पाण्याचं महत्त्व अनन्यसाधारण असणारच. आपल्या शरीरातही साठ ते पासष्ट टक्के पाणीच असतं. शरीरात जलतत्त्वाचा पिंवा द्रवरूपाचा खूपच मोठा वाटा आढळतो. आपल्या शरीरातील अन्न, प्राणवायू, संप्रेरक (होर्मोन्स), विकरे आणि टाकाऊ पदार्थांचंही वहन करणाऱया पाच लिटर रक्तात पंचावन्न टक्के जो द्रवरूप प्लाझ्मा (रक्तरस) असतो, त्यामध्ये दहा ते बारा टक्के पाणीच असते. इतपं आपलं आणि पाण्याचं अतूट नातं. पाण्याविना जगण्याची कल्पनाच आपण करू शकत नाही म्हणून तर त्याला ‘जीवन ऐसे नाव!’

शरीराला पाण्याची गरज भासते. त्याला आपण ‘तहान लागली’ असं म्हणतो. तहान-भुकेचं नियंत्रण करणारे केंद्र मेंदूच्या तळाशी असलेल्या अधःश्चेतक पिंवा ‘हायपोथलॅमॅस’ नावाने असतं. त्याद्वारे शरीरातील पाण्याची गरज ठरवली जाते. घसा कोरडा पडणे, शरीरात क्षार वाढणे, रक्तदाब आणि नाडीच्या गतीत बदल होणे अशा लक्षणांनी या केंद्राला सूचना मिळते आणि आपल्याला ‘तहान’ लागल्याचा साक्षात्कार होतो! मग आपण पाणी पिऊन तहान शमवतो.

पाणी प्यायल्याने शरीरातील रासायनिक प्रक्रियांना चालना मिळते. रक्ताभिसरणाद्वारे अन्नघटक, प्राणवायू, संप्रेरके इत्यादी पेशींपर्यंत पोहोचतात. तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ विसर्जित करण्याचे कामही पाणीच करते. आपल्या फुप्फुसाभोवती अभ्य्ा्राचे दोन थर असतात. त्यामधील पोकळीत पिंवा ‘प्लुरा’मध्ये दोनशे पन्नास मिलिलिटर एवढा विशिष्ट द्रवरूप पदार्थ असतो. तीच गोष्ट हृदयाची. मिनिटाला बहात्तर वेळा ‘ठक ठक’ करणाऱया हृदयाभोवतीही असलेल्या दोन पापुद्रय़ांच्या मधल्या पोकळीत म्हणजे ‘पेरिकाडियम’मध्येही दीडशे मिलिलिटर द्रवरूप पदार्थ असतो.

मेंदू तर आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा घटक. अत्यंत नाजूक मेंदूचं रक्षण करण्यासाठी सभोवती कठीण पेशींचे दुहेरी आवरण असते व त्यामधील भागात (मेंदू आणि मज्जारज्जूला वेढणाऱया) ‘सेरिब्रोस्पिनाल फ्लुईड सीएसएफ’ असा सामान्यांना क्लिष्ट वाटेल असा द्रवरूप पदार्थ असतो. मेंदूमध्ये ते ‘पाणी’ रोज अर्धा लिटर या प्रमाणात तयार होते आणि त्याचा रक्तामध्ये पुन्हा निचराही होतो.

पावसाने जोर धरला की, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, शेतीभातीला बहर येईल ते खरंच, पण त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची स्वच्छता आणि शुद्धता या काळात आपल्याला लक्षात घ्यावीच लागेल. कारण पाण्यात मिसळलेल्या काही अनारोग्यकारक जंतू आणि इतर तत्त्वांनी विविध पावसाळी आजार उद्भवू शकतात. त्याचा विचार पुढच्या लेखात करू या.

– [email protected]