बळीराजा सुखावला; रत्नागिरीत मुसळधार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरला आहे. यामुळे बळीराजासह नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रत्नागिरीकर मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत होते. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला.

आज सकाळीही पाऊस सुरू होता. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक ठिकाणी पाणी साचले. किल्ला दसपट वाडी येथे भागेश्वर मंदिर आवाराची संरक्षक भिंत कोसळून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पऱ्या बंद झाल्याने रस्त्यावरून वाहत जाणारे पाणी लोकांच्या घरात शिरून नुकसान झाले. या ठिकाणी राहणारे जाधव, बापर्डेकर, ढोले यांच्या घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.पुर्णगड येथील विलास पवार यांच्या घराजवळची भिंत कोसळून घराचे नुकसान झाले.पावसामुळे शंकर पवार यांच्या शौचालयाचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील पांगरी फाटा येथील रस्त्यावर दरड कोसळली. देवरूख येथील राजेश राजेश पोकळे, प्रसाद पोकळे आणि उदय पोकळे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून 10 लाख 65 हजार रुपयांचे नुकसान झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 291 मिमी पाऊस पडला. मंडणगड मध्ये 152 मिमी, दापोली 283मिमी, खेड138 मिमी, गुहागर 377 मिमी, चिपळूण 143 मिमी, संगमेश्वर 292मिमी, रत्नागिरी 428 मिमी, लांजा 531 मिमी आणि राजापुरात 283 मिमी पाऊस पडला.