नगर झेडपी, पंचायत समित्यांची अंतिम गट-गण रचना जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट-गणांच्या प्रारूप रचनेवरील हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम गट-गट रचना जाहीर करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने नगर तालुक्यातील गट-गण रचनेत काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 2 जून जिह्यातील 85 जिल्हा परिषद गट आणि 170 पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली. या रचनेवर हरकती मागविल्या होत्या. प्रारूप रचनेवर जिल्हाभरातून एकूण 65 हरकती दाखल झाल्या होत्या. या दाखल हरकतींवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुनावणी घेतली. हरकतींवर 22 जून 2022 पर्यंत निर्णय घेऊन अंतिम गट व गणांच्या रचनेस मंजुरी देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त गमे यांनी सुनावणीत 65 पैकी केवळ 8 हरकतींवरील आक्षेप मान्य केले. त्यानुसार काही गटांत दुरुस्ती करून अंतिम रचनेस बुधवारी (दि.22) मान्यता दिली.

नगर तालुक्यातून सर्वाधिक 12 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी निंबळक येथील समीर पटेल, भोरवाडी येथील रामदास भोर, शिराढोण येथील प्रितेश दरेकर, गुणवडी येथील अक्षय कुटे, निंबळक येथील कानिफनाथ कोतकर, चास येथील राधाकृष्ण वाळूंज व निंबळक येथील डॉ. दिलीप पवार यांच्या 7 हरकती विचारात घेऊन विभागीय आयुक्त गमे यांनी नगर तालुक्यातील गट व गणांत फेरफार करीत अंतिम रचना जाहीर केली आहे.

देहरे नव्हे आता वडगाव गुप्ता गट

जिल्हा परिषदेच्या प्रारूप गट-गण रचनेत वडगाव गुप्ता हे गाव नवनागापूर गणात समावेश करण्यात आला होता. हरकतीनंतर वडगाव गुप्ता गाव नव्याने अस्तित्वात आलेल्या वडगाव गुप्ता या गटात समाविष्ट करण्यात आले, तर प्रारूपमधील निंबळक गणाचे नाव नेप्ती करण्यात आले. निंबळक गावचा समावेश नवनागापूर गणात करण्यात आला आहे. जिल्हा परिषद गट गण रचनेत देहरे गट करण्यात आला होता; परंतु आता देहरे गटाचे नाव बदलण्यात आले असून, देहरे गटाचे नाव वडगाव गुप्ता करण्यात आले आहे.

निंबळक गण संपुष्टात; निमगाव वाघा, जखणगाव नेप्ती गणात

जिल्हा परिषदेच्या प्रारूप गट व गण रचनेत निंबळक गट संपुष्टात आला होता. नव्याने तयार करण्यात आलेल्या गण रचनेत निंबळक गण अस्तित्वात होता; परंतु हरकती अंती निंबळकचा समावेश नवनागापूर गणात झाला आहे. नवनागापूर गटात नेप्ती गण अस्तित्वात आला असून, निंबळक गणही संपुष्टात आला आहे. निंबळक गावचा समावेश नवनागापूर गणात करण्यात आला आहे. निमगाव वाघा व जखणगावचा समावेश नेप्ती गणात झाला आहे.

नागरदेवळे जिल्हा परिषदेतच

गेल्या काही दिवसांपूर्वीच नगर तालुक्यात नागरदेवळे नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. यामध्ये नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळीचा समावेश करण्यात आला. पूर्वी नागरदेवळे गट स्वतंत्र होता; परंतु प्रभाग रचना सुरू असतानाच ही नगरपरिषद करण्यात आली. त्यामुळे नागरदेवळे गटाचा समावेश नगरपरिषदेऐवजी जिल्हा परिषदेत झाला. याबाबत नगर तालुका महाविकास आघाडी व कर्डिले गटाकडून हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. अंतिम गट-गण रचनेत नागरदेवळे जिल्हा परिषदमध्येच राहिले आहे.

वाटेफळ, दहिगाव चिचोंडी पाटील गणात

जिल्हा परिषदेच्या प्रारूप गट गण रचनेत दरेवाडी गटातील अरणगाव गणात वाटेफळचा समावेश होता, तर दरेवाडी गणात दहीगावचा समावेश होता. या दोन्ही गावांवर हरकत नोंदविण्यात आली होती. दहिगाव व वाटेफळ या दोन्ही गावांचा समावेश चिचोंडी पाटील गणात करण्यात आला आहे.

तालुकानिहाय गट (कंसात गण)

अकोले 6 (12), नगर 7 (14), राहुरी 6 (12), पारनेर 6 (12), श्रीगोंदा 7 (14), कर्जत 5 (10), जामखेड 3 (6), संगमनेर 10 (20), कोपरगाव 6 (12), श्रीरामपूर 5 (10), नेवासा 8 (16), राहाता 6 (12), शेवगाव 5 (10), पाथर्डी 5 (10).