
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांचा नगर जिल्ह्यात शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. फुटीर आमदारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या वेळी एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. जोडे मारो आंदोलन केल्यानंतर त्या आमदारांचे पुतळे जाळण्यात आले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेची नगर येथील नक्षत्र लॉन या ठिकाणी शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर ,रफिक शेख ,युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड ,शहरप्रमुख संभाजी कदम ,महापौर रोहिणी शेंडगे,महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, सभापती पुष्पा बोरुडे ,माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा परिषद सभापती काशिनाथ दाते, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली. बंडखोर आमदारांचे पुतळे उभारून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. बंडखोरांना त्यांची जागा दाखवून द्या, उद्धव साहेब एक अंगार है बाकी सब भंगार है, हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.






























































