बदनामीसाठी फेसबुक, व्हॉट्सऍपचा सर्वाधिक वापर; आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो, पोस्ट केल्याप्रकरणी 700 गुन्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजमाध्यमांचा जसा चांगला वापर होतो तसाच काही विकृत मनोवृत्तीचे लोक या माध्यमांचा चुकीच्या कामासाठी वापर करताना आढळून येतात. कोणाची बदनामी करायची असेल अथवा बदनामी करायची धमकी देऊन पैसे उकळायचे असतील तर समाजमाध्यमांचा वापर करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या पाच महिन्यांत राज्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सऍप, ई-मेल व अन्य माध्यमातून अश्लील, आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा फोटो प्रसारित केल्या प्रकरणी 704 गुह्यांची नोंद करण्यात आली आहे.

एखाद्याची बदनामी करायची असेल अथवा बदनामी करायची धमकी देऊन पैसे उकळायचे असल्यास समाजमाध्यमांचा हत्यारासारखा वापर करणाऱयांचे प्रमाण वाढू लागले आहे. कधीही, कुठूनही अगदी सहजपणे हे कृत्य करता येत असल्याने समाजमाध्यमांचा नको त्या कृत्यासाठी वापर करण्याचे प्रमाण नागरिकांमध्ये वाढतानाचे चित्र आहे. महिला, पुरुष, अल्पवयीन बालकांबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या प्रकरणी गेल्या पाच महिन्यांत राज्यभरात 704 गुह्यांची नोंद झाली असून त्यापैकी 261 गुह्यांची उकल करून 201 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

फेसबुक व व्हॉट्सऍपच्या माध्यमातून महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो, पोस्ट केल्याचे सर्वाधिक 290 गुह्यांची नोंद झाली आहे. ई-मेल व अन्य समाजमाध्यमांतून अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी 154 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, तर पुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एकूण 60 गुह्यांची नोंद झाली आहे. यापैकी 15 गुह्यांची उकल करत 13 जणांना पोलिसांनी गजाआड धाडले आहे.

लहानग्यांचे लैंगिक शोषण

अल्पवयीन मुले व मुलींच्या बाबतीत फेसबुक व व्हॉट्सऍपच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ तसेच फोटो सार्वजनिक करून बालकांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 92 गुह्यांची नोंद झाली असून त्यापैकी 43 गुन्ह्यांची उकल करून 28 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर समाजमाध्यमांवर बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी 108 गुह्यांची नोंद झाली आहे.