
पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याची वाहतूक स्वतंत्रपणे करून उपनगरीय लोकलचा मार्ग मोकळा करणाऱया पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत सुरू आहे. पहिला टप्पा खार ते बोरिवली हा 19.32 कि.मी.चा असून मार्च 2023 पर्यंत तो पूर्ण करण्यात येणार आहे, तर दुसरा टप्पा मुंबई सेंट्रल ते खार असा 10.18 कि.मी.चा असून तो मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) एमयूटीपी -2 अंतर्गत मुंबई सेंट्रल ते बोरिवली असा सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाला (30 कि.मी.) 2008-09 मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 913 कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले होते. मार्च 2021 पर्यंत त्यापैकी 402 कोटी रु. तर 2021-22 या आर्थिक वर्षापर्यंत 55.87 कोटी असा एकूण 458 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत खर्च झाला असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.
पुनर्वसन लटकले
सांताक्रुझ आणि विलेपार्ले दरम्यानच्या 26 प्रकल्पग्रस्तांपैकी तिघांचे, विलेपार्ले आणि अंधेरीदरम्यान 22 जणांचे पुनर्वसन रखडले आहे. अंधेरी ते जोगेश्वरीतील 67 प्रकल्पबाधितांपैकी सहा जणांना, तर जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान 186 प्रकल्पबाधितांपैकी 36 जणांना पर्यायी जागा मिळालेली नाही. तर गोरेगाव ते मालाडदरम्यानचे 30 जण, मालाड व कांदिवलीतील 161 जण अशा एकूण 606 प्रकल्पबाधितांपैकी 560 जणांना पर्यायी जागा देण्यात यश आले असून 223 जणांचे पुनर्वसन लटकले आहे.
– 6 व्या मार्गिकेसाठी वांद्रे टर्मिनस येथे जागा हवी आहे. येथे वांद्रे ते खार हार्बरलाईनसाठी पूल बांधावा लागणार असून त्याचे काम रखडले आहे.
-पश्चिम रेल्वेच्या माहीम आणि खारदरम्यान पाचवी मार्गिका तयार करण्यात आली आहे.
– मुंबई सेंट्रल ते बोरिवली या पहिल्या टप्प्यासाठी महालक्ष्मी येथील शक्ती मिलच्या कंपाऊंडची 88.0 चौरस मीटरच्या जागेची गरज आहे. शक्ती मिलची जागा सरकारने लीजवर दिली असल्याने तिचा ताबा मिळाल्याशिवाय हा मार्ग पुढे सरकणार नसल्याचे म्हटले जात आहे.
जागेअभावी सहावी लाइन अशी रखडली
प्रकार लोकेशन जागा (चौ.मी.) संपादित शिल्लक
खासगी बोरिवली 150मी. 487 43 444
विलेपार्ले 10 मी.
पालिका विलेपार्ले 120 मी. 312 312 0
लष्कर कांदिवली 110 मी. 201 201 0
सरकारी महालक्ष्मी 80 मी. 88 0 88
एकूण 1089 557 532




























































