
जम्मू-कश्मीरच्या प्रसिद्ध अमरनाथ यात्रेला आज गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. हर हर महादेवच्या घोषणा देत 4890 भाविकांची पहिली तुकडी बुधवारी पहाटे जम्मूच्या बेस कॅम्पवरून यात्रेसाठी रवाना झाली. कोरोनामुळे दोन वर्षे अमरनाथ यात्रा झाली नव्हती तसेच जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरची ही पहिलीच यात्रा आहे. त्यामुळे यंदा विक्रमी आठ लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
तब्बल 3880 मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुहेची 43 दिवसांची यात्रा पहलगामच्या 48 किलोमीटरचा मार्ग आणि कश्मीरातील बालाटोल येथील 14 किलोमीटरच्या छोटय़ा पण दुर्गम मार्गावरून एकाच वेळी सुरू होईल. आतापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. जम्मू-कश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले, अमरनाथ यात्रा भाविकांसाठी खूप महत्त्वाची आहे. यात्रेकरूंना डोळ्यांसमोर ठेवून अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी या यात्रेत सीआरपीएफसह सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था केली आहे.
दहशतवादी हल्ल्याचे सावट; ड्रोनविरोधी प्रणाली कार्यरत
उदयपूरमध्ये झालेल्या टेलरच्या हत्येमुळे देशात दहशतवादी धोका वाढला आहे. स्टिकी बॉम्ब आणि ड्रोन हल्ले, यंदाचे सर्वात मोठे धोके आहेत. त्यामुळे अमरनाथ यात्रेबाबत पोलीस प्रशासनही हाय अलर्टवर आले आहे. यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सुरक्षा दलांचे 70 हजार ते एक लाख जवान यात्रा मार्गावर तैनात केले आहे. याशिवाय सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या साह्याने दोन्ही मार्गांवरील यात्रांची निगराणी केली जाणार आहे. अतिरेक्यांकडून ड्रोनचा वापर होण्याची शक्यता गृहीत धरून यात्रेच्या मार्गांवर यंदा पहिल्यांदाच ड्रोनविरोधी प्रणाली बसवण्यात आली आहे. भाविकांना पहिल्यांदाच आरएफआयडी टॅग दिले जात आहेत, जेणेकरून त्यांना घेऊन जाणाऱया वाहनांची जीपीएसच्या मदतीने निगराणी केली जाईल.
























































