मीटर रीडिंग करणाऱया पाच एजन्सी बडतर्फ, सोलापूर जिह्यातील तीन, तर पुण्यातील दोन एजन्सींचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज मीटरच्या रीडिंगमधील अचूकतेसाठी महावितरणने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱया एजन्सींविरुद्ध तसेच महावितरणच्या अधिकाऱयांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर चुकीचे रीडिंग घेणाऱया सोलापूर जिह्यातील तीन व पुणे जिह्यातील दोन अशा पाच मीटर रीडिंग एजन्सीजना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. तसेच, तीन कार्यकारी अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.

पुणे प्रादेशिक विभागांतर्गत सर्व मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक व प्रतिनिधींची पुणे येथे बैठक झाली. यावेळी संचालक संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक योगेश गडकरी, प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता संजय पाटील, सचिन तालेवार, सुनील पावडे, परेश भागवत उपस्थित होते. या बैठकीत एका सादरीकरणाद्वारे एजन्सीकडून होणाऱया फोटो मीटर रीडिंगमधील चुका, सदोष रीडिंग, मीटर नादुरुस्तीबाबत चुकीचे शेरे आदींची माहिती देऊन त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत एजन्सीजच्या संचालकांना उपाय सांगण्यात आले.

संजय ताकसांडे म्हणाले की, मीटर रीडिंग हा बिलिंगचा मुख्य आधार आहे. त्यात 100 टक्के अचूकता पाहिजे. चुकीचे किंवा सदोष रीडिंग घेतल्यास महावितरणच्या महसुलाचे नुकसान आणि ग्राहकांना वीज बिल दुरुस्तीचा त्रास होतो, ही बाब खपवून घेतली जाणार नाही. मीटर रीडिंग एजन्सीजविरुद्ध केवळ कारवाई करणे हा उद्देश नाही. परंतु, रीडिंगसाठी जे अचूकतेचे, गुणवत्तेचे मापदंड आहेत, त्यात कुचराई झाल्यास एजन्सीज व महावितरणच्या अधिकाऱयांविरुद्ध कारवाई केली जाईल. वारंवार सूचना देऊनही एजन्सीजने रीडिंगमधील चुका किंवा सततचे दोष टाळले नाहीत, तर एजन्सीजविरुद्ध बडतर्फी व काळ्या यादीत टाकण्यासह प्रसंगी फौजदारी कारवाई केली जाईल, असे ताकसांडे यांनी स्पष्ट केले.