राज्यात फक्त दहा दिवसांचा रक्तसाठा, मुंबईतील रक्तपेढय़ांमध्ये 7 हजार युनिट रक्त उपलब्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णवाढ होत असताना संकटाच्या ‘कोरोना काळा’प्रमाणे पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईत दररोज 500 ते एक हजार युनिट तर राज्यात 3 ते 5 हजार युनिट रक्ताची गरज भासत असताना सद्यस्थितीत रक्तपेढय़ांमध्ये 44 हजार 72 युनिट रक्त उपलब्ध आहे. हा रक्तसाठा पुढील 7 ते 8 दिवस पुरेल इतकाच आहे.

डायलिसिससह अपघातग्रस्त, शस्त्र्ाक्रियेदरम्यान मोठय़ा प्रमाणात रक्ताची गरज भासते. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात राज्य रक्त संक्रमण परिषद मान्यताप्राप्त रक्तपेढय़ा, पालिका, सामाजिक संस्था, मंडळे यांच्याकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करत गरजूंना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. मात्र मार्च 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाली. त्यामुळे रक्त तुटवडा निर्माण होत आला आहे.

अशी आहे स्थिती

– राज्यात – 36,749 युनिट

– मुंबई – 7,323 युनिट

– राज्यात रोजची रक्ताची गरज – 3 ते 5 हजार युनिट रक्त

– मुंबईत रोजची रक्ताची गरज – 500 ते एक हजार युनिट रक्त

– राज्यात रक्तपेढी संख्या – 350

– मुंबईत रक्तपेढी संख्या – 57

अशी आहे आकडेवारी

2011 च्या जनगणनेनुसार राज्यातील लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 होती. लोकसंख्येच्या तुलनेत 2020 मध्ये रक्तदान शिबिरांतून 15 लाख 46 हजार 805 युनिट रक्त जमा झाले होते. तर 2021 मध्ये आयोजित रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून 16 लाख 73 हजार 947 युनिट रक्त जमा झाले होते. लोकसंख्येच्या तुलनेत रक्तदान करणाऱया रक्तदात्यांची संख्या फारच कमी असल्याने मंडळे, संस्था-संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.