एटीएममधील नोट सॉर्टिंग मशीनची तपासणी करा, रिझर्व्ह बँकेचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॅंकांनी दर तीन महिन्यांनी एटीएममध्ये बसवण्यात आलेले नोट सॉर्टिंग मशिन तपासावेत, असे आदेश शुक्रवारी आरबीआय दिले आहेत. जेणेकरून चलनी नोटा सुस्थितीत आणि निर्धारित मापदंडांशी सुसंगत राहतील.

नोव्हेंबर 2016 साली झालेल्या नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या. तसेच इतर मूल्यांसाठी नवीन चलनमालिका जारी केल्या. नोटांची नवीन मालिका सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, नोट प्रमाणीकरण आणि फिटनेस वर्गीकरण मापदंडांचे पुनरावलोकन केले गेले आहे आणि अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वांचा सुधारित संच जारी केला आहे.

‘नोट सॉर्टिंग मशीन्स – ऑथेंटिकेशन आणि फिटनेस सॉर्टिंग पॅरामीटर्स’ या परिपत्रकात आरबीआयने म्हटले आहे की, नोटा सुस्थितीत असल्यास त्याचे मूल्य सहज तपासता येते आणि ती पुनर्वापरासाठी योग्य ठरवता येते. पण नोट सुस्थितीत नसल्यास तिचा पुर्नवापर करता येत नाही. आरबीआयने काही मापदंड देताना सांगितले की, नोटांचा पुर्नवापर करताना त्या नोटांची स्थिती तपासून त्या वापरात येणे गरजेचे आहे. हे मापदंड बँकांद्वारे वापरल्या जाणार्‍या रोख हाताळणी मशीनसाठी किमान मानके प्रदान करतात.

नोटांचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो जेव्हा त्यांचे मूल्यमापन घालून दिलेल्या मापदंडानुसार योग्य असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे बनावट नोटा, सुस्थितीत नसलेल्या नोटा तपासण्यासाठी ही यंत्रणा सक्षण असणे गरजेचे आहे. त्यासाठी बँकांनी नोट सॉर्टिंग मशीनचा वापर करताना दर तीन महिन्यांनी त्याची तपासणी करणे गरजेचे आहे. त्याची अचूकता आणि सातत्य यासाठी दर तीन महिन्यांनी चाचणी केली जाते आणि आवश्यकता भासल्यास पुन्हा चाचणी करावी. यासाठी एक बँक अधिकार्‍यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र रेकॉर्डसाठी राखले जाईल, असेही आरबीआयने म्हटले आहे.