टेम्पोच्या आडोशाला झोपलेला चाकाखाली चिरडून ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसामुळे टेम्पोच्या आडोशाला झोपलेल्या मद्यपी बिगाऱ्याचा चाकाखाली सापडल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वाहनचालकाने हलगर्जीपणा केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 जूनला रात्री नऊच्या सुमारास मंगळवार पेठेतील वजनकाट्यासमोर घडली.

विनोद विश्वास वानखेडे (वय 35) असे वाहनाखाली चिरडून ठार झालेल्याचे नाव आहे. पोलीस अंमलदार सचिन खाडे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा बिगारी काम करीत होता. ३० जूनला मद्यपान केल्यानंतर पावसामुळे तो मंगळवार पेठेतील टेम्पोखाली झोपला. काहीवेळानंतर आलेल्या टेम्पो चालकाने वाहनाखाली कोणी बसले आहे का याची खातरजमा केली नाही. टेम्पो सुरू करून चालविल्यामुळे चाकाखाली सापडून विनोद वानखेडे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग तपास करीत आहेत.