आमदार रमेश लटके यांना विधानसभेत श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल काटीकल शंकरनारायणन, विद्यमान सदस्य रमेश लटके यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी ते म्हणाले, कै. रमेश कोंडीराम लटके यांचा जन्म 21 एप्रिल 1970 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण एसएससीपर्यंत झाले होते. कै. लटके यांनी सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तसेच पूर्व मोगरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. मुंबईतील अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. सन 1997, 2002 व 2007 असे तीन वेळा ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते. तर 2014 व 2019 मध्ये अंधेरी (पूर्व) मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. विधान मंडळाच्या आश्वासन समिती, ग्रंथालय समिती, मराठी भाषा समिती अशा अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते. अशा या उमद्या समाजसेवकाचे बुधवार, 11 मे रोजी दुःखद निधन झाले, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी मंत्री हुसेन मिश्री खान दलवाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली.