
पायी जाणाऱ्या नागरिकांना अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने पुण्यातील हडपसर परिसरातून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता, मिरची पुडी, कटर, दोन रॉड असा साठा जप्त केला आहे. अर्जुन शिवाजी कांबळे (वय 22, रा. हडपसर), मैनुद्दीन इरफान पठाण (वय 24), गणेश बालाजी भांडेकर (वय 20), हर्षद शिवशंकर टेकांळे (वय 19) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार बाबा गफार पठाण (वय 19) हा आरोपी पसार झाला आहे.
हडपसरमधील भाजी मंडई परिसरात ही टोळी लुटमार करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मोहसिन शेख आणि गणेश थोरात यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ते नेमका दरोडा कुठे टाकणार होते तसेच त्यांचा प्लॅन काय होता, याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. ही कामगिरी अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, एपीआय विशाल मोहिते, राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, शंकर नेवसे, संजय जाधव, उत्तम तारू, निखिल जाधव, मोहसीन शेख, गणेश थोरात, विजयकुमार पवार, गजानन सोनुने, कादिर शेख, नागनाथ राख यांनी केली.

























































