
गोवंश हत्या करणाऱया कत्तलखान्यावर संगमनेर पोलिसांनी पुन्हा छापा घातला असून, 500 किलो गोमांस, जिवंत गायी-वासरांसह 11 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी (वय 19), सलीम मुस्ताक कुरेशी (वय 24, दोघे रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
संगमनेर येथील अवैध कत्तलखान्यांमधून गोवंश हत्या नेहमीच घडत असतात. थोडय़ाफार काळापुरत्या बंद झाल्यानंतर पुन्हा या गोवंश हत्या सुरू होतात. पोलिसांनी या ठिकाणी अनेक वेळेला छापे घातले आहेत. अनेक कारवाया केल्या आहेत. तरीही या गोवंश हत्या आणि कत्तलखाने बंद होत नाहीत.
संगमनेर शहर पोलिसांनी पहाटे कोल्हेवाडी रोड येथे छापा घालून त्या ठिकाणी गोवंश हत्या सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर 500 किलो गोवंश मांस जप्त केले. यावेळी हे मांस वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी 3 चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच घटनास्थळावरून कुऱहाड, दोन धारदार चाकू, तीन गायी आणि एक वासरूदेखील पोलिसांनी जप्त केले आहेत. साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी, सलीम मुस्ताक कुरेशी यांना अटक करण्यात आलेली आहे. यासंदर्भात पोलीस नाईक सचिन कचरू उगले यांनी फिर्याद दिली आहे.






















































