रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी, 10 मे रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील व शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबून मुलुंडहून धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. या सेवा नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील व मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील, पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 04.05 पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून) पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 03.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 09.45 ते दुपारी 03.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 03.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 03.20 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी स्थानकापर्यंत विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. मेग ब्लॉक कालावधीत बेलापूर/ नेरुळ-खारकोपर लाईन सेवा प्रवाशांच्या सोयीकरिता उपलब्ध असेल.