सांगली जिह्यात मुसळधार पावसाची हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धरण पाणलोट क्षेत्रातील धुवांधार पावसानंतर जिह्यात शनिवारी पावसाची संततधार सुरू राहिली. शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. खानापूर, जत, कवठे महांकाळ, तासगाव, आटपाडीत पावसाची रिमझिम सुरू होती. सांगली शहरातही दिवसभर पावसाच्या सरी बरसल्या.

सांगली जिह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली, तरी जोर कमी राहिला. शनिवारी जिह्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. शिराळा आणि वाळवा तालुक्यांत दमदार पाऊस सुरूच आहे. पलूस, मिरज, कडेगाव तसेच खानापूर तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये मध्यम पाऊस झाला. याशिवाय जत, कवठे महांकाळ, आटपाडी, तासगाव तालुक्यांत रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीपात्रात पाण्याची आवक वाढत चालल्याने पाणीपातळीतही झपाटय़ाने वाढ होत आहे. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी शुक्रवारी संध्याकाळी 7.6 फुटांवर पोहोचली. पावसाचा जोर सुरूच राहिल्यास पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे. सांगली शहर परिसरात दिवसभर रिमझिम पावसाच्या सरी बसरत होत्या.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सलग पाचव्या दिवशी शनिवारी सुरूच राहिला. चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासांत 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या 15.80 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

पावसामुळे पेरण्यांना पोषक वातावरण

पावसाने ओढ दिल्याने मोठय़ा प्रमाणात क्षेत्र पेरणीविना होते; परंतु जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत पेरण्यांना गती येण्याची शक्यता आहे. काही भागात उसाची आडसाल लागण केली जात आहे. आगाप पेरणी झालेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे.