
>> अरुण जोशी
‘एका तळय़ात होती, बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक’ हे ग. दि. माडगूळकर यांचं गीत आठवतंय? ‘अग्ली डकलिंग’ या मूळ इंग्लिश कवितेचं ते उत्कृष्ट रूपांतर, अनुवाद नव्हे, 1843 मध्ये प्रसिद्ध झालेल्या डॅनिश कवी हॅन्स ऍन्डरसन यांच्या कल्पनेवरचं स्वतंत्र मराठी गाणं. गदिमांचे शब्द, आशाताईंचे स्वर आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत असलेलं हे भावगीत प्रचंड गाजलं. आजही ते अनेक जण गुणगुणत असतात.
परंतु हे गाणं गदिमांनी ‘सुखाचे सोबती’ या चित्रपटासाठी लिहिलं होतं. सुलोचनादीदी आणि ग्रामीण भागातली त्या काळातली शाळकरी मुलं यांच्यावर चित्रित झालेल्या त्या गाण्याचं संगीत होतं श्रेष्ठ संगीतकार वसंत पवार यांचं आणि स्वर होता मधुबाला जव्हेरी-चावला यांचा. आता नेटवर हे गीत उपलब्ध आहे. ते जरूर ऐका. चित्रपटाच्या दृष्टीने त्याची आर्त चाल आणि मधुबाला जव्हेरी-चावला यांचा सुरेल स्वर त्या गाण्याला लाभला होता. असं म्हणतात की, हा स्वर एका संगीतकाराला साक्षात लतादीदींच्या स्वरासारखा वाटला होता. ती गोष्टच असेल कदाचित, पण मधुबालांचा आवाज अतिशय गोड आणि भावस्पर्शी होता यात शंका नाही. 2010 मध्ये एका कार्यक्रमात त्यांना पाहिलं होतं, पण त्यांचं गाणं प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला नाही. मधुबालांचा जन्म मुंबईतल्या गिरगावमधला. त्या काळी मराठीचं सांस्कृतिक केंद्र असलेल्या या परिसरात अनेक कलाकार राहत होते. मधुबाला यांच्या घरातच गाणं होतं. त्यांची आई हिराबाई आणि मावशी श्यामला माजगावकर यांनी 1929 मध्ये ‘स्वामी समर्थ संगीत विद्यालया’ची स्थापना केली होती. मधुबाला यांच्या सांगीतिक शिक्षणाचा आरंभ तिथेच झाला. गोड आवाजाची नैसर्गिक देणगी असलेल्या मधुबाला यांना साहजिकच चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. ‘भूले भटके’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी एक गाणं गायिलं, पण हंसराज बहेल यांच्या ‘राजपूत’ या चित्रपटातून त्यांच्या गाण्याची मोहर उमटली. 1952 मध्ये आलेल्या ‘जग्गू’ या चित्रपटातली सातपैकी पाच गाणी मधुबाला जव्हेरी यांची होती. 1950च्या दशकात मधुबाला जव्हेरी-चावला हे नाव गानक्षेत्रात गाजत होतं. त्यांची अनेक हिंदी गाणी लोकप्रिय झाली. लतादीदींसह त्यांनी ‘जा री जा निंदिया’ हे सी. रामचंद्र यांचं संगीत असलेलं ‘झांझर’ चित्रपटातलं गीत गायिलं. ‘मोती महल’ सिनेमात महंमद रफी यांच्यासह ‘जायेगा जब जहां से’ आणि तलत मेहमूद यांच्यासह ‘दोस्त’ चित्रपटातलं ‘ऐ जमाने बता’ किंवा ‘बूट पॉलिश’मधलं आशा भोसले यांच्याबरोबर गायिलेले ‘ठहर जरा ओ जानेवाले’ इत्यादी गाणी त्या काळात रसिकप्रिय झाली.
मराठीमध्ये तर त्यांनी अनेक चित्रपट गीतं आणि भावगीतं गायिली. ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटासाठी मधुबाला जव्हेरी-चावला यांनी गायिलेली गाणी म्हणजे ‘अरे अरे नंदाच्या पोरा,’ ‘सांगा या वेडय़ाला’ (सहगायक विठ्ठल शिंदे) अशी गाणी गायिली. ‘सुखाचे सोबती’मधलं ‘एका तळय़ात होती’ आहेच. ‘वैजयंता’ चित्रपटात वसंतराव देशपांडे यांच्यासह ‘सप्रेम नमस्कार विनंती विशेष’ हे वेगळय़ाच धाटणीचं संगीतकार वसंत पवारांनी दिलेलं गाणं मधुबालांनी गायिलंय. ‘भाग्यलक्ष्मी’ चित्रपटासाठी शांता शेळके यांचं ‘मी आळविते जयजयवंती’ आणि ‘अवघाचि संसार’मधलं डॉ. वसंत अवसरे म्हणजेच शांता शेळके यांचं ‘आळविते केदार’ ही मधुबाला जव्हेरी-चावला यांची रागदारीवर आधारित उत्कृष्ट गाणी.
याशिवाय भावगीतांमध्ये त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. ‘जिवाच्या जिवलगा नंदलाला रे’ हे संजीवनी मराठे यांचं यशवंत देव यांनी संगीत दिलेलं गाणं किंवा ‘माझ्या गालाला पडते खळी’ आणि ‘गडे पाहू नका हात लावू नका’ अशी मधुकर रानडे यांची श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली भावगीतं कर्णमधुर आहेत.
संगीताच्या क्षेत्रात गायक-गायिका म्हणून अनेकांनी एकेक कालखंड गाजवला. मराठीत तर एकाच वेळी अनेक सुरेल स्वर रसिकांना मोहून टाकत होते. लता-आशा आणि मंगेशकर भगिनी तर होत्याच. पण सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, मालती पांडे अशा कितीतरी गायिकांची गाणीही रसिकांचे कान तृप्त करत होती. मधुबाला जव्हेरी-चावला त्यापैकीच एक सुरेल स्वर!























































