दिल्ली डायरी – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी  

गेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना गुजरातमध्ये निर्णायक ठरू पाहणाऱ्या जातीची मते आकर्षित करण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाच्या सिंहासनावर बसविण्यात आले. वास्तविक राष्ट्रपतीपदासाठी जनसंघ ते भाजप अशी संघर्ष केलेल्या मंडळींची टंचाई त्यावेळी नव्हती आणि आताही नाही, पण कोणाच्या ध्यानीमनी नसलेल्या नावावर शिक्कामोर्तब करायचे धक्कातंत्र भाजपच्या सध्याच्या श्रेष्ठींनी नेहमीच वापरले आहे. आताही राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांचे नाव निश्चित करताना राजकीय, जातीय गणिते आणि धक्कातंत्र अवलंबवण्यात आले आहे.

देशात विरोधी पक्ष एकसंध नाही. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना मिळालेल्या 66 टक्के मतदानाहून अधिक मते यावेळच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळतील का, हे पाहावे लागेल. द्रौपदी यांच्याविरोधात निवडणूक लढवत असलेले यशवंत सिन्हा हे विद्वान गृहस्थ आहेत. प्रशासकीय सेवेतून राजकारणात येऊन अटलजींच्या काळात एक सक्षम अर्थमंत्री म्हणून त्यांनी ठसा उमटवला होता. राष्ट्रपतीपदाच्या यंदाच्या निवडणुकीचे मतांचे एकूण मूल्य 10 लाख 86 हजार 431 इतके आहे. विजयासाठी मुर्मू यांना 5 लाख 43 हजार 216 या मत मूल्यांची आवश्यकता आहे. भाजपप्रणित ‘एनडीए’कडे 5.26 लाख इतकी मते आहेत. ‘एनडीए’ला ही निवडणूक जिंकण्यासाठी 13 हजार अतिरिक्त मतांची बेगमी हवी आहे. मात्र, मुर्मूंच्या नावाने आदिवासी कार्ड खेळल्यानंतर बहेनजींचा बसपा, नवीनबाबूंचा बिजू जनता दल, हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा, वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांनी मुर्मू यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

आम्रपाली आंब्याची डिप्लोमसी

बांगलादेशची निर्मिती ही पाकिस्तानचे एक घाव दोन तुकडे करून इंदिरा गांधी यांनी केली होती. हा इतिहास सध्याच्या सत्ताधारी दिल्लीकरांना कदापी रुचणारा नाही. मात्र याच बांगलादेशचे प्रसिद्ध आम्रपाली आंबे सध्या सत्ताधारी दिल्लीकरांना लुभावत आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सालाबादाप्रमाणे यंदाही भलेमोठे आंब्याचे पेटारे आपल्या पंतप्रधान, राष्ट्रपतींसाठी पाठविले. शेजारील राज्य असलेल्या ममतादिदींनाही उगाच कटकटी नकोत, म्हणून हसीना यांनी काही पेटय़ा पाठवल्या आहेतच. दिल्लीच्या ल्यूटन झोनमध्ये सध्या या आम्रपाली आंब्याचा घमघमाट आहे. दोन देशांमधले परस्परसंबंध वगैरे वृद्धिंगत होण्यासाठी असे डिप्लोमसीचे रितीरिवाज पाळले जातात. मात्र, मधल्या काळात याच बांगलादेशने हिंदुस्थानला मोठय़ा प्रमाणावर वाकुल्या दाखविल्या होत्या. विशेषतः एनआरसी कायदा मोदी सरकारने मोठय़ा हट्टाने आणल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटून बांगलादेशातील हिंदूंवर मोठय़ा प्रमाणावर हल्ले झाले होते. मात्र त्या वेळीही आपले 56 इंचीचे सरकार गपगुमान होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर खरेतर यंदा आम्रपाली आंब्याची भेट नाकारून बांगलादेशला योग्य ती समज व आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य तो संदेश देणे शक्य होते. मात्र आम्रपालीच्या घमघमाटाने आपले राज्यकर्ते पाघळले हेच खरे!

लोकसभेतील भोजपुरी क्लब

भाजपात तसा नटनटय़ांचा बोलबाला कमी नाही. ‘शायनिंग इंडिया’ ते ‘न्यू इंडिया’ या भाजपच्या प्रवासात नटनटय़ांना मुक्तपणे प्रवेश देण्यात आला आहे. कलाकारांची लोकप्रियता एन्कॅश करण्याबरोबरच पक्षविस्तार करण्याचा त्या पक्षाचा अजेंडा असू शकतो. लोकसभेत मनोज तिवारी व रवी शुक्ला ऊर्फ रवी किशन हे दोन तगडे भोजपुरी कलाकार उपस्थित असताना आता आझमगढच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या वतीने कमळ फुलवलेले दिनेश लाल ऊर्फ निरहुआ हेही या भोजपुरी कलाकारांच्या पंक्तीत लोकसभेत येऊन बसले आहेत. या तीनही भोजपुरी कलाकारांचे वैशिष्टय़ म्हणजे यापैकी एकाचीही पार्श्वभूमी ही भाजपची किंवा संघाची नाही. तिघांनाही पहिल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला हेही आणखी एक विशेष. 2009 मध्ये मनोज तिवारींनी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर गोरखपूरमधून निवडणूक लढविली व ते सपशेल पराभूत झाले. 2014 मध्ये मोदी लाटेत ते अचानक मोदीमय होऊन दिल्लीतून लोकसभेवर निवडून गेले. रविकिशन यांनी 2014 साली जौनपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली. भोजपुरी कलाकार म्हणूनही जनतेने त्यांची गय केली नाही इतक्या वाईट पद्धतीने ते निवडणूक हरले. त्यानंतर 2019 मध्ये भाजपकडून लोकसभेवर निवडून आले. दिनेश लाल यांनी 2019 मध्ये अखिलेश यांच्याविरोधात निवडणूक लढविली व मोठय़ा फरकाने पराभव पत्करला. मात्र, पराभवानंतरही त्यांनी मतदारसंघातले आपले काम चालूच ठेवले. त्याची बक्षिसी जनतेने त्यांना यावेळी दिली. निरहुआ यांच्या आगमनामुळे लोकसभेतील ‘भोजपुरी क्लब’ने आता चांगलेच बाळसे धरले आहे. बाकी कोणालाही ‘अच्छे दिन’ या देशात अजून तरी आलेले नसले तरी भोजपुरी कलाकारांना मात्र ‘अच्छे दिन’ आलेले आहेत, हे नाकारून कसे चालेल?

[email protected]