
शिवसेनेने बंडखोर आमदारांना व्हीप न पाळल्याबद्दल त्यांना अपात्र ठरवावे अशा आशयाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. त्याचप्रमाणे बंडखोर आमदारांकडूनही आमचाच व्हीप खरा असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी शिवसेना व बंडखोर अशा 53 आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठविली असून सात दिवसांत विधानसभा अध्यक्षांकडे आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवड तसेच विश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला होता, मात्र 39 आमदारांनी व्हीपविरोधात मतदान केले. त्यामुळे या आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना गटनेते अजय चौधरी यांच्याकडून अध्यक्षांकडे करण्यात आली होती. त्याचप्रमाणे बंडखोर आमदारांकडून भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या 14 आमदारांनी व्हीपविरोधात मतदान केल्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. या दोन्ही तक्रारींनुसार 53 आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
माझ्यावर प्रेम दाखविण्याची गरज नाही
बंडखोरांकडून करण्यात आलेल्या तक्रारीतून शिवसेना नेते-आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. याविषयी आजही पत्रकारांनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, ‘माझ्यावर खास प्रेम दाखविण्याची गरज नाही. प्रेम असते तर त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला नसता. शिवसेनाही आपलीच आहे आणि चिन्हही आपलेच आहे’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
विधानसभा सदस्यच नसलेली व्यक्ती मेलवर अविश्वास प्रस्ताव आणू शकत नाही
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे मांडले आहे. विधानसभेचे सदस्य नसलेल्यांच्या आयडीवरून माझ्याविरुद्ध अविश्वासाचा मेल आला. अशा अज्ञात ई-मेलवरून संदेश मिळाल्याने हा अविश्वास प्रस्ताव नाकारला होता. असे सांगतानाच शिंदे गटाकडून पाठविलेल्या नोटिसीचाही त्यांनी विरोध केला आहे. अपात्रतेची कारवाई पूर्ण होईपर्यंत बंडखोर आमदारांना विधानसभेत प्रवेश देऊ नये, सभागृहाच्या कामकाजातही भाग घेता येऊ नये, असे म्हणणे त्यांनी याआधीच न्यायालयासमोर मांडले आहे.































































