नीट 17 जुलैलाच होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट युजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणीस दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. त्यामुळे ‘नीट’ परीक्षा ठरलेल्या तारखेलाच म्हणजे 17 जुलैलाच होणार आहे. ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी याचिका करणे योग्य नसून या याचिकेत कोणतेही तथ्य नसल्याचे मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले. तसेच या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनादेखील दिल्या.

एका याचिकेद्वारे दिल्ली उच्च न्यायालयात ‘नीट’ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. तसेच विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून द्याव्यात असेही या याचिकेत म्हटले होते, मात्र ही मागणी न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी फेटाळली. ‘नीट’ परीक्षेचे प्रवेशपत्र 12 जुलै रोजी जारी करण्यात आली. यानंतरही काही विद्यार्थी परीक्षा स्थगित करण्याची मागणी करीत होते. तसेच सीयूईटी उद्या, 15 जुलै रोजी होणार असून या दोन्ही परीक्षा लागोपाठ येत असल्याने विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षेला विरोध केला होता.