
पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दोन महिलांचे 2 लाख 20 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 17 ते 18 जुलैला पुणे ते हडपसर आणि स्वारगेट ते पुरमचौक प्रवासादरम्यान घडली. याप्रकरणी हडपसर आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार प्रणाली गाडगे (वय 26, रा. राजगुरूनगर, खेड ) 17 जुलैला दुपारी पावणेचारच्या सुमारास भोसरी ते भेकराईनगर बसप्रवास करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील दीड लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा मिळून 1 लाख 51 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. जी. थोरात तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत स्वारगेट ते पुरम चौकादरम्यान प्रवास करणाऱ्या जेष्ठ महिलेच्या हातातील 70 हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी कापून नेली. ही घटना 18 जुलैला संध्याकाळी चारच्या सुमारास घडली आहे. पुरम चौकात बसमधून उतरल्यानंतर महिलेला हातातील सोन्याची बांगडी चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बावचे तपास करीत आहेत.



























































