पालिकेला ‘ओबीसी’सह आरक्षण नव्याने जाहीर करावे लागणार? आठवडाभरात निर्देशांची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाने ‘ओबीसी’ आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास परवानगी दिल्यामुळे मुंबई महानगरपालिकेलाही आता ‘ओबीसी’सह नव्याने प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढावी लागणार आहे. यासाठी आठवडाभरात निवडणूक आयोगाकडून निर्देश येण्याची शक्यता असल्याचे पालिका अधिकाऱयाकडून सांगण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेच्या वाढलेल्या नऊ प्रभागांसह एकूण 236 प्रभागांच्या आरक्षणाची सोडत पालिकेने 31 मे रोजी काढली होती. यामध्ये प्रत्यक्ष लॉटरी पद्धतीने 32 प्रभागांची लॉटरी काढण्यात आली, तर 204 जागांवर ‘प्राधान्यक्रमाने’ आरक्षण जाहीर करण्यात आले होते. यामध्ये अनुसूचित जाती-15, अनुसूचित जमाती 2 आणि सर्वसाधारणसाठी 219 जागा निश्चित झाल्या होत्या. मात्र आता ‘ओबीसी’सह आरक्षणाची लॉटरी काढावी लागणार आहे. लॉटरी नव्याने जाहीर करावी लागणार असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे निवडणुकीचा कार्यक्रम पाहता ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता पालिका अधिकाऱयाकडून व्यक्त करण्यात आली.