
सध्या राज्यात सुरू असलेली बंडखोरी हे मोठे षड्यंत्र असून मुंबईला केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव आहे. पण शिवसेना तो कधीच यशस्वी होऊ देणार नाही. मुंबई शिवसेनेचीच आहे आणि ती आम्ही जिंकणारच, असा निर्धार दहिसर पश्चिम येथे आयोजित निर्धार मेळाव्यात निष्ठावंत शिवसैनिकांनी केला.
दहिसरच्या शिवसेना शाखा क्रमांक 7 मध्ये हा मेळावा झाला. विभागातील जनता आणि शिवसैनिक आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असे याप्रसंगी उपनेते व म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर म्हणाले. जनता-शिवसैनिक आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून तुमच्यामुळे शिवसेना नसून शिवसेनेमुळे तुम्ही आहात हे बंडखोरांनी लक्षात घ्यावे, असा इशारा त्यांनी दिला.
शिवसेनेच्या स्थापनेपासून आपण एकनिष्ठ असून संघटनेने शाखाप्रमुख पदापासून विभागप्रमुख व विधान परिषद आमदार पदापर्यंत मानाचे स्थान दिल्याचे मत विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस यांनी व्यक्त केले. येणाऱया महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला प्रभाग क्र. 7 पुन्हा निवडून आणणे हेच बंडखोरांना जोरदार प्रत्युत्तर असेल, असे ते म्हणाले.
या मेळाव्याला महिला संघटक सुजाता शिंगाडे, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, उपविभाग संघटक शपुंतला शेलार, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, विधानसभा संघटक अविनाश लाड, संदीप राऊत, शर्मिला पाटील, विधानसभा समन्वयक किशोर म्हात्रे, उपविधानसभा समन्वयक अतुल तावडे, शाखाप्रमुख अक्षय राऊत, शाखा संघटक दीपा चुरी, शाखा समन्वयक मनोहर पाटील, कृतिका तावडे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शीतल म्हात्रेंनी फसवून नेले, महिलांचा आरोप
आपल्याला ‘मातोश्री’वर जायचे आहे असे सांगून बंडखोर शीतल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी नंदनवन येथे पक्षप्रवेशाच्या वेळी फसवणूक करून नेल्याची माहिती यावेळी शिवसेनेच्या नीता समेळ यांनी दिली. यावेळी नंदनवन बंगल्याहून परत आलेल्या नीता समेळ, मालती पाटील, दर्शना सावंत या महिलादेखील उपस्थित होत्या.

























































