
अंधेरी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरच्या वादातून कुकने वेटरची हत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. जगदीश जलाल असे मृताचे नाव आहे. हत्ये प्रकरणी माधव मंडलला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हिमाचलचा रहिवाशी असलेला जगदीश हा अंधेरीच्या एमआयडीसी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचा. तर बिहारचा रहिवाशी असलेला माधव हा त्या हॉटेलमध्ये गेल्या वर्षभरापासून कुकचे काम करतो. गुरुवारी रात्री जेवणाच्या ऑर्डरवरून जगदीश आणि माधवचा वाद झाला होता. तेव्हा हॉटेलच्या मॅनेजरने तो वाद मिटवला होता. त्या दोघांची समजूत काढण्यात आली होती. आज सकाळी जगदीश आणि माधव हे नेहमीप्रमाणे डय़ुटीला आले. सकाळी साडेआठच्या सुमारास जगदीश हा किचनमध्ये गेला. तेव्हा माधव हा किचनमध्ये भाजी कापत होता. तेव्हा त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात माधवने भाजी कापण्याच्या चाकूने जगदीशच्या छातीवर आणि पाठीवर वार केले. हा प्रकार इतर कर्मचाऱयांच्या लक्षात येताच त्याने जगदीशला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून माधव मंडलला अटक केली.































































