पन्हाळगडावर खुलेआम दारुपार्टी, संतप्त शिवप्रेमींची निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूरच्या पन्हाळगडावर पर्यटकांची खुलेआम दारुपार्टी रंगल्याचा प्रकार समोर आला आहे. पन्हाळगडावरील झुणका भाकर केंद्रांमध्ये काही पर्यटक दिवसाढवळ्या दारू ढोसत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या तळीरामांमध्ये काही महिला व ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश होता. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी सकाळी कोल्हापूरमधील शिवप्रेमींनी पन्हाळगडाजवळ निदर्शने केली. गडावर एवढी निंदनीय घटना घडत असताना पुरातत्व विभाग झोपा काढत आहे का? असा प्रश्न यावेळी शिवप्रेमींनी उपस्थित केला. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करण्यात आला. तसेच ‘ह्यो आमचा गड हाय, दारू प्यायचा अड्डा न्हाय’ अशा घोषणा शिवप्रेमींनी दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पन्हाळा गडावर दारू ढोसण्याची हिम्मत होऊच कशी शकते असा प्रश्न यावेळी उपस्थीत करण्यात आला. प्रशासनाने या दारुड्यांना धडा शिकवावा असे आवाहन राज्यभरातील शिवप्रेमी करत आहेत. मागच्या काही काळात राज्यातील किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. काही दिवसांपूर्वी पन्हाळगडावरील बुरुज देखील ढासळला होता. मात्र पुरातत्व विभागाने याबाबत कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने शिवप्रेमींनी पुरातत्व विभागावर नाराजी व्यक्त केली.