
>> नामदेव सदावर्ते
पंढरीच्या विठ्ठलाचे लडिवाळ भक्त संत नामदेवरायांनी श्रीविठ्ठलाचे व पंढरीचे माहात्म्य अभंगबद्ध केले आहे. बालपणापासूनच ते विठ्ठलाचे भक्त होते. बालपणी नामदेवांनी श्रीविठ्ठलास नैवेद्य समर्पिला, तो नैवेद्य श्रीविठ्ठलांनी प्रत्यक्ष प्रकट होऊन खाल्ला. वारकरी संप्रदायाचे प्रचारक म्हणून श्री नामदेवांच्या कार्याचा गौरव केला जातो. श्रीविठ्ठल माहात्म्य, पंढरी माहात्म्य, श्रीविठ्ठलाची स्तुती व भक्तवत्सलता या विषयावर त्यांनी अभंगबद्ध रचना केली आहे. आजच्या संत नामदेव यांच्या पुण्यतिथीनिमत्त…
पंढरीला सारे संत आपले माहेर मानतात. श्रीविठ्ठल पिता व रुक्मिणी माता मानतात. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी सारे वारकरी भक्तभाविक श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी व संसारातील सुख-दुःख विठ्ठलास सांगण्यासाठी हरिनाम गात पंढरपूर येथे जातात.
भक्तांना जसा विठ्ठलाचा लळा आहे, तसेच विठ्ठलाचेही भक्तांवर प्रेम आहे. देवाला भक्तांचे वेड व भक्तांना देवाची ओढ असते. संत नामदेव म्हणतात-
विटेवरी उभा दीनांचा कैवारी । भेटाया उभारी दोन्ही बाह्या ।।
गुणदोष याचे न पाहेचि डोळां । भेटे वेळोवेळी केशिराज ।।
ऐसा दयावंत घेत समाचार । लहान आणि थोर सांभाळितो ।।
सर्वांलागी देतो समान दरुशन । उभा तो आपण समपायी ।।
नामा म्हणे तया संतांची आवडी । भेटावया कडाडी उभाची असे ।।
श्रीविठ्ठल आणि भक्त एकरूप आहेत. निर्गुण, निराकार, निर्विकल्प असा हा देव सगुण साकार झाला आहे. पुंडलिकासाठी तो पंढरपुरी आला आहे. त्याचे मूळगाव मायापूर आहे. कटीवर कर ठेवून तो विटेवर उभा आहे. याच्या भेटीसाठी एकच उपाय आहे.
विठ्ठल नाम हृदयी धरा । हाचि उतार पैलपारा ।।
मग नाही येरझारा । शंभू कुमरा सांगतसे ।।
भेटी चौघे मुरडले । अठरा धावता भागले ।।
पंथी साही भांडले । ते अद्यापि बुझले नाही ।।
तपस्वीयांचे तप, जप करणाऱ्यांचे जाप्य, तेजस्वींचे तेज असे हे कुळदैवत आहे. पुंडलिकाच्या भाग्याने ते पंढरपुरी आले. संत नामदेवराय म्हणतात-
वेडावली वाचा वेदाची बोलतां । देवा पाहूं जाता अनिर्वाच्य ।।
अनिर्वाच्य वाचा बोलावया गेली । जिंव्हा हे चिरली भूधराची ।।
भूधराची जिव्हा जालीसे कुंठित । नामा म्हणे अंत नलगे त्याचा ।।
श्रीविठ्ठलाचे माहात्म्य सांगताना नामदेवराय म्हणतात, वैकुंठामध्ये भगवंताचे चतुर्भुज रूप आहे. क्षीरसागरात देवाचे निद्रिस्त रूप आहे. द्वारकेत श्रीकृष्ण रूप आहे. हृदयी तर अव्यक्त रूप आहे. पण या सर्व रूपांपेक्षाही पंढरीचे विठ्ठलरूप सुंदर आहे. असे सुंदर रूप वैकुंठात, क्षीरसागरात, द्वारकेतही नाही. पंढरीतील विठ्ठलरूप आनंददायी व तेजस्वी आहे. नामदेवराय म्हणतात-
सुखाचे हे सुख श्रीहरि मुख । पाहतांही भूक तहान गेली ।।
भेटली भेटली विठाई माऊली । वासना निवाली जिवातील ।।
चंद्रासी चकोर मेघासी मयूर । वाटे तैसा भर आनंदाचा ।।
नामा म्हणे पाप आणि तापदुःख । गेले जाले सुख बोलवेना ।।
सर्व तीर्थक्षेत्रांपेक्षा पंढरी हे तीर्थक्षेत्र पवित्र व पावन आहे. भगवंतांनी प्रथम पंढरीची निर्मिती केली व नंतर वैकुंठ निर्माण केले. सृष्टीची उत्पत्ती होण्यापूर्वीसुद्धा पंढरपूर हे तीर्थक्षेत्र होते. संत नामदेवराय वर्णन करतात –
चंद्रभागेच्या तटी । धन्य पंढरी गोमटी ।।
नासिलीयां भूमंडळ । उरे पंढरी मंडळ ।।
असे सुदर्शनावरी । म्हणूनि अविनाश पंढरी ।।
नामा म्हणे बा श्रीहरीं । ते म्यां देखिली पंढरी ।।
संसारातील सुख, समृद्धीसाठी सर्वजण प्रयत्न करतात. पण कितीही तळमळ, धडपड केली तरी संसारात खरे सुख, आनंद मिळत नाही. नामदेवराय म्हणतात- हे संसारी जीवा, तू एक वेळ पंढरीस जाऊन त्या पांडुरंगाचे दर्शन घे. तुला सुख तर मिळेलच, पण तू देहासह सुखरूप होशील. तू जन्मोजन्मीचे दुःख विसरशील. चंद्रभागेत स्नान केल्यावर तुझे पाप, ताप, दोष नष्ट होतील. पांडुरंगाच्या महाद्वारी लोटांगण घालून गरुडापारी कान धरून नाच. तू पूर्णसुखी होशील.
एका अभंगात संत नामदेव म्हणतात- विठोबाच्या गावी मी धावत जाईन. पांडुरंगाच्या चरणी लोळण घेईन. त्यामुळे माझा सारा शिणभाग जाईन. मी पांडुरंगास माझ्या जीवीचे सुख-दुःख सांगेन. आनंदाच्या भरात मी मंदिराच्या महाद्वारी जाईन, तेथे मला पांडुरंग भेटण्यासाठी सामोरा येईल. मला तो प्रेमाने उचलून जवळ घेईल. स्वतःच्या पितांबराने माझे मुख पुसेल. तो माझ्या मस्तकावर अभयहस्त ठेवील. पंढरी हे संतांचे माहेर. तेथे मायबाप भेटतात.
वैकुंठास आम्हां नको धाडूं हरी । वास दे पंढरी सर्वकाळ ।।
वैकुंठ कोपट जुनाट झोपडी । नको अडाआडी घालूं आम्हां ।।
नामदेवराय म्हणतात, आमचा हा देव सर्वदा पंढरीत आमच्याजवळ राहतो, म्हणून आमच्या भाग्यास पार नाही.
धन्य जालो आम्ही तुझिया प्रसादे । नाचे तुझ्या छंदे नामदेव ।।
भक्तांना श्रीविठ्ठलाचे सगुणदर्शन प्रिय आहेच. पण त्या भगवंताचे नामही आवडते. देवाचे नाम भक्ताला अमृताहून गोड वाटते. भगवंत गोड आहेच, पण त्याचे नाम त्याहून गोड आहे.
अमृताहूनि गोड नाम तुझे देवा । मन माझे केशवा कां बा नेघे ।
यज्ञ, योग, दान, उपासना, व्रत हे साधन मला माहीत नाही. जप, तप, तीर्थाटन मी जाणत नाही.
नामेविण काही आम्हापाशी नाही । विचारोनि पाही पांडुरंगा ।।
धन वित्त सर्व आमुचि ही जोडी । नामा म्हणे गोडी नामी तुझे ।।
नामदेवराय म्हणतात, हे देवा, तुझ्या पायापाशी राहिल्यावर नित्य सर्व सुख मिळते म्हणून मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवताला शरण गेलो नाही. तुझ्या कीर्तनाने मला सुखसमाधान मिळते. महाद्वारी उभे राहताच चौऱ्यांशीच्या साखळ्या तुटतात, म्हणून हे देवा, पंढरीत तुझ्या चरणांजवळ मला अखंड वास दे. त्यामुळे मला पुन्हा जन्म-मरणाच्या फेऱ्यात सापडण्याचे भय नाही.
तूटोनि आकाश पडेलहि शिरी । न सोडी मी हरी पाय तुझे ।।
वेदाला जो समजत नाही. श्रुतीसही जो अनाकलनीय आहे. तो भगवान पंढरीत सहज पाहावयास मिळतो. त्याचे रूप सुंदर आहे. त्या देवाचे नामही सुंदर आहे. अशा विठ्ठलाचे दर्शनही सुख देणारे आहे. नामदेवराय म्हणतात-
वेदांसी कानडा श्रुतीसी कानडा । विठ्ठल उघडा पंढरीये ।।
नाम बरवे रूप बरवें । दर्शन बरवें कानडीयाचें ।।
नामा म्हणे तुझे अवघेचि बरवे । त्याहुनि बरवे प्रेम तुझे ।।






























































