माजी प्रेयसीचा खून करून विवाहित पत्रकाराची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या माजी प्रेयसीवर संशय घेऊन तिची हत्या करत एका पत्रकाराने आत्महत्या केली आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे घडली असून या पत्रकाराचा मृतदेह नर्मदा नदीत सापडला आहे.

या पत्रकाराचं नाव बादल पटेल असं आहे. त्याचे अनिभा केवट नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. बादल विवाहित असूनही अनिभावर संशय घेत असे. 23 जुलै रोजी अनिभा हिचा मृतदेह गौर परिसरातील नर्मदा नदीवरील पुलावर एका गाडीत सापडला होता. तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचं दिसून येत होतं.

तिच्या हत्येचा थेट संशय तिचा माजी प्रियकर बादल पटेलवर होता. कारण, काही दिवसांपूर्वी बनावट पत्रकारांवर झालेल्या कारवाईत बादलला अटक झाली होती. त्या प्रकरणातील शिक्षेमुळे त्याला तुरुंगवास घडला होता. दरम्यान, अनिभा हिचे एका कंपनी मॅनेजरसोबत प्रेमसंबंध जुळले होते. बादल तुरुंगातून परतल्यानंतर त्याला या संबंधाविषयी कळलं आणि त्याचा संताप झाला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

बादलने अनिभाला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने एका ठिकाणी बोलवलं आणि मित्राच्या गाडीतून नर्मदेवरील पुलावर घेऊन गेला. तिथे वाद झाल्याने बादलने तिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच पुलावरून नर्मदेत उडी मारली. तीन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख पटवण्यात आली असून हत्येसाठी वापरलेली पिस्तुलही जप्त करण्यात आली आहे.