माळढोक पक्षी नान्नज अभयारण्यात परतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेला माळढोक पक्षी नान्नज-गंगेवाडी अभयारण्यात परतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अभयारण्यातील संरक्षित क्षेत्रामध्ये मादी माळढोकचा वावर दिसत आहे. दरवर्षी ठराविक कालावधीत परतणारा माळढोक, त्यासाठी राखीव असणाऱया अभयारण्यात स्थिरावत का नाही? तो इतरवेळी जातो कुठे? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

अभयारण्यामध्ये माळढोक पक्षाचा अधिकास नसल्याचा डांगोरा सातत्याने पिटण्यात येतो. पण, तीन वर्षांपासून जुलै ते ऑक्टोबरदरम्यानच माळढोक पक्षाच्या मादीचा नियमित वावर असतो. सध्या सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे गवत चांगले वाढले आहे. त्यावरील किडे, नाकतोडे, उंदीर खाण्यासाठी माळढोक पक्षी अभयारण्यात दरवर्षी परत येतो.

मागील दोन दिवसांपासून अभयारण्यातील संरक्षित क्षेत्रामध्ये माळढोक पक्षी गवताकरील किडे खात असताना वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱयांना गस्त घालताना दिसला. गेल्या आठवडय़ात माळढोक परत आल्याचा अंदाज वन्यजीव कर्मचाऱयांनी व्यक्त केला. शुक्रवारी दुपारी अभयारण्यातील रस्ता ओलांडून माळढोकची मादी गवतावरील किडय़ांवर ताव मारत फिरत असतानाचे व्हिडीओ चित्रीकरण वन्यजीव कर्मचाऱयांनी केले.

देशभरात माळढोक पक्ष्यांची संख्या 100 ते 150 पर्यंत आहे. राजस्थानमध्ये सर्वाधिक संख्या आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये या पक्ष्यांचा अधिवास आढळतो. महाराष्ट्रात अमरावती, नाशिक व सोलापूर जिल्ह्यांत माळढोकचा वावर आहे. सोलापूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये मागील काही वर्षांमध्ये माळढोक आढळला नाही. सोलापुरातील माळरानावर माळढोक काही महिन्यांसाठी स्थलांतरित होत आहे.

पाच वर्षांची प्रौढ मादी नान्नज-गंगेवाडी माळढोक अभयारण्यात गेल्या आठवडय़ापासून गवताळ माळरानावर फिरताना दिसून येत आहे. दरवर्षी जुलै-ऑगस्ट दरम्यान मादी माळढोक अभयारण्यात दिसते. या संदर्भातील माहिती वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आली आहे. वन विभागाचे कर्मचारी नियमित गस्त घालत आहेत. ‘गवताळ माळरानाचा राजा’ अशी माळढोक पक्षाला उपाधी आहे. मूळ अधिकासामध्ये पक्षी परत आला असून, हे समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक आहे. – गुरुदत्त दाभाडे, वनपाल, माळढोक अभयारण्य.