
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री लोणी काळभोर परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. कौटुंबिक कारणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हवालदार सुनील नारायण शिंदे (वय 50, रा. कवडी माळवाडी कदमवस्ती ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शिंदे हे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार पदावर काम करीत होते. बुधवारी रात्री ते त्यांच्या खोलीत झोपण्यास गेले. गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यानंतरही ते बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलाने दरवाजा वाजवला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर मुलाने बाजूच्या खिडकीतून पाहिल्यावर वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, शिंदे यांच्या सुनेने काही दिवसांपुर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणी शिंदे आणि कुटुंबीयांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणाची बुधवारी न्यायालयात सुनावणी होती. यामध्ये दाखल झालेल्या आरोपपत्राच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.




























































