
>> वैभव शिरवडकर
अतिवृष्टीमुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुलात गेल्या वर्षीप्रमाणे पाणी शिरू नये, दरड कोसळून नुकसान होऊ नये यासाठी पाणीपुरवठा खात्याने नॅशनल पार्कच्या डोंगराच्या बाजूने नव्याने सहा मीटर उंच आणि 530 मीटर लांबींची संरक्षक भिंत बांधली आहे. जुन्या पंपिंग स्टेशनजवळ पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी 490 मीटर लांबीचे बॉक्स ड्रेन बांधले असून फिल्टर बेड आणि पंपिंग हाऊसभोवती असलेल्या पंपाऊंड भिंतींची उंची दोन फुटांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता भांडुप जलशुद्धीकरण संकुल पूर्णपणे वॉटरप्रूफ बनले आहे.
मुंबईत गेल्या वर्षी 17 आणि 18 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुलामध्ये पावसाचे पाणी शिरून पंपिंग हाऊस आणि फिल्टर बेडचे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण संकुलाभोवती पूरप्रतिबंधक भिंत बांधणे, आधीच्या भिंतीचा विस्तार करणे, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातून येणारे पुराचे पाणी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तुळशी तलावाकडे वळते करण्यासाठी विशेष प्रवाह मार्ग बांधण्यात यावा, असे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले होते.
विहार, तुळशीचे पाणी संकुलात शिरू शकत नाही
भांडुप जलशुद्धीकरण संकुलाजवळच तुळशी आणि विहार हे म्बुंईकरांना पाणीपुरवठा करणारे तलाव आहेत. गेल्या वर्षी या तलावांतील पाणी संकुलात शिरले असे म्हटले जात होते, मात्र ते खरे नाही. भांडुप जलशुद्धीकरणाच्या वरच्या बाजूला तुळशी तलाव असून हा तलाव भरून वाहू लागला की, त्यातील पाणी पेंद्राच्या खालच्या बाजूला असलेल्या विहारमध्ये जाते. विहारही भरून वाहू लागला की, त्याचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. त्यामुळे या दोन्ही तलावांतील पाणी संकुलात येणे अशक्यच आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे संजय गांधी नॅशनल पार्कमधील डोंगरावरून आलेल्या पाण्याचा लोंढा संकुलात शिरल्यामुळे नुकसान झाले होते, अशी माहिती जल अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
संकुलाचे सर्वेक्षण
त्या पार्श्वभूमीवर टाटा कन्सलटन्सीकडून संकुलाचे सर्वेक्षण करण्यात आले. संकुलात पाणी शिरले तर ते वाहून जाण्यासाठी बॉक्स ड्रेन, फिल्टर बेड व पंपिंग हाऊसमध्ये पाणी शिरू नये यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची शिफारस या संस्थेने केली होती. त्यानुसार बॉक्स ड्रेन, फिल्टर बेड आणि पंपिंग हाऊसभोवती पंपाऊंड आणि संरक्षक भिंतींचे कामही पूर्ण झाले आहे.
– 1 मीटर उंचीची आणि 800 मीटर लांबीच्या एकूण कंपाऊंड भिंतीची उंची 2 मीटरने वाढवली आहे.
– संकुलात राहणाऱया कर्मचारी वसाहतीभोवतीही कंपाऊंड भिंत बांधण्यात आली आहे.
– जुन्या पंपिंग स्टेशनला 490 बॉक्स ड्रेन बांधून पूर्ण झाले असून नवीन पंपिंग स्टेशनला 450 मीटर लांबीची बॉक्स ड्रेन बांधण्यात येणार आहे.
आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प
भांडुप जलशुद्धीकरण संकुल हा संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. वनजमिनीवर हा प्रकल्प असून राज्य सरकारने ही जमीन महापालिकेला लीजवर दिली आहे. या प्रकल्पातून मुंबईच्या पाणीपुरवठय़ापैकी सुमारे 65 टक्के पाण्याचे शुद्धीकरण या एकटय़ा प्रकल्पामध्ये केले जाते. संकुलातील दोनपैकी एका जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 1 हजार 910 दशलक्ष लिटर तर दुसऱया प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 900 दशलक्ष लिटर इतकी आहे. विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा या सहा तलावांतील पाण्याचे शुद्धीकरण भांडुपमध्ये होते तर भातसा धरणातून येणाऱया पाण्याचे शुद्धीकरण भिवंडीतील पिसे-पांजरापूर पालिकेच्या जलशुद्धीकरण पेंद्रात होते. पिसे-पांजरापूरमध्ये दररोज 1 हजार 365 दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धीकरण होते.























































