
केंद्रीय जल शक्ती मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मध्य प्रदेशमधील दामोह मतदार संघात दूषित पाणी प्यायल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. ते पाणी प्यायल्याने 45 जण आजारी पडले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रल्हाद पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर नल’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी काम करत आहेत. गावागावातील प्रत्येक घरात नळावाटे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचले पाहिजे असा या योजनेचा मुख्य हेतू आहे. असे असताना आता चक्क प्रल्हाद पटेल यांच्याच मतदारसंघातील खानचारी पाटी गावात दूषित पाणी प्यायाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
खानचारी पाटी गावात गेल्या काही दिवसांपासून गावकऱ्यांना दूषित पाणी मिळत आहे. त्यामुळे गावातील 45 च्या वर नागरिकांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्या सर्वांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका वृद्ध महिलेचा व पुरुषाचा मृत्यू झाला. दहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना दामोह येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तर इतर 35 जणांना तालुक्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


























































