
पुणे – नगर रस्त्यावर सुमो गाडीमध्ये झोपलेल्या चालकाला दमदाटी करून त्याची गाडी चोरली. त्यानंतर त्याच गाडीतून पळून जाताना वानवडी येथे एका पादचाऱ्याला धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या दोघांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने ताब्यात घेतले. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीची 4 वाहने जप्त केली. आरोपींकडून वाहने, जबरी चोरीचे विविध पोलिस ठाण्यातील 7 गुन्हे उघडकीस आले आहेत.
रोहित रामप्रताप वर्मा (वय 22, रा. वानवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. वर्मा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे पथक हद्दीमध्ये गस्त घालत होते. यादरम्यान अंमलदार शिवाजी जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी वर्मा आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारांना हडपसर येथून एका दुचाकी गाडीसह ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. साळुंखे विहार रोडवरील एका हॉटेलसमोर दुचाकी चालकास लिफ्ट मागण्याचा बहाणा करुन हाताने मारहाण करीत त्याची दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. यानुसार आरोपी वर्मा याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चार दिवसांपूर्वी पहाटे साडेचार वाजता नगर रस्त्यावरून सुमो गाडी चोरल्याचे कबूल केले. गाडीत झोपलेल्या चालकाला दमदाटी करून गाडी पळून नेली. त्यानंतर ही गाडी घेऊन पळून नेताना वानवडीतील गणेशनगर भागात आल्यानंतर गाडीवरचा ताबा सुटला आणि एका पादचाऱ्यांच्या अंगावर गाडी गेली.
यावेळी वर्मा याचा अल्पवयीन साथीदार गाडी चालवत होता. अपघातात पादचाऱ्याच्या जागीच मृत्यू झाला. यानंतर वर्मा आणि त्याचा साथीदार दोघेही पसार झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीची चार दुचाकी वाहने जप्त केली असून कोंढवा, वानवडी, हडपसर, हिंजवडी यासह विविध पोलिस ठाण्यातील 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजेश अभंगे, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव, राहुल इंगळे, संदीप येळे, विनायक येवले, विकांत सासवडकर यांनी केली आहे.


























































