आरोग्याची नवी आणीबाणी – मंकी पॉक्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. प्रदीप आवटे

23 जुलै 2022 रोजी शनिवारी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी मंकी पॉक्स ही आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचे घोषित केले. 2009 ते 2022 या कालावधीतील म्हणजे अवघ्या 13 वर्षांतील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील मंकी पॉक्स ही सातवी आंतरराष्ट्रीय आणीबाणी! म्हणजे जवळपास दर दोन वर्षांनी एक आणीबाणी इतके हे प्रमाण काळजी वाटावे एवढे अधिक आहे. ही सारी परिस्थिती आपल्याला आपण सार्वजनिक आरोग्य क्षेत्राकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची निकड स्पष्ट करते. जागतिकीकरण आणि शहरीकरण या दोन घटकांमुळे नवनवीन आजार आपल्या भेटीला येत असताना सार्वजनिक आरोग्य हा आपला पहिल्या बाकावरील विषय आहे हे आपण समजावून घेण्याची गरज आहे.

राजकीय आणीबाणीची चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो, पण त्यासोबतच सध्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय आणीबाणी ही ब्रेकिंग न्यूज आहे. मागील काही महिन्यांपासून आपण मंकी पॉक्स या आजाराबाबत चर्चा ऐकतो आहोत. 23 जुलै 2022 रोजी शनिवारी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी मंकी पॉक्स ही आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचे घोषित केले आणि या आजाराचे महत्त्व अजूनच अधोरेखित झाले. मागील काही दिवसांमध्ये हा आजार हिंदुस्थानसह जगभरातील 75 देशांमध्ये पसरला असून त्यामध्ये जवळपास सोळा हजारांहून अधिक रुग्ण आढळलेले आहेत. 28 जुलैपर्यंत हिंदुस्थानातही या आजाराचे चार रुग्ण आढळले आहेत.

आरोग्याची आंतरराष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय?

सार्वजनिक आरोग्याची आंतरराष्ट्रीय आणीबाणी ( Public Health Emergency of International Concern – PHIEC efHeâkeâ) ही संकल्पना काय आहे, हे आपण समजावून घेतले पाहिजे. वैश्विक आरोग्य परिस्थिती हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन असा एक कायदा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. 1967च्या या कायद्यात कॉलरा, प्लेग आणि यलो फिवर हे तीनच आजार आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा नोटिफायेबल होते. 2005 साली या कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या आणि त्यामध्ये कोणत्याही आजारापेक्षा फिक ही संकल्पना मांडण्यात आली. केवळ जैविक आजार हीच आरोग्यविषयक आणीबाणी असू शकत नाही ही नवीन महत्त्वपूर्ण धारणा यामधून पुढे आली. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय आणीबाणी (फिक) यामध्ये चार बाबी महत्त्वाच्या आहेत ः

1) असामान्य आणि अनपेक्षित घटना घडणे.
2) या घटनेचा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रावर महत्त्वपूर्ण परिणाम असणे.
3) यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रसाराची शक्यता असणे.
4) त्यामुळे आंतरराष्ट्रीय दळणवळण आणि व्यापार यावर निर्बंध घालण्याची गरज लागू शकणे.
या चारपैकी कोणत्याही दोन किंवा अधिक बाबी होत असतील तर अशा घटनेला जागतिक आरोग्य संघटना आणीबाणी म्हणून घोषित करते.

मंकी पॉक्स उद्रेकाचे बदलते स्वरूप

मंकी पॉक्स हा आजार 1970 पासून मुख्यत्वे मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळतो. या दोन्ही भागांतील विषाणूमध्ये काही जनुकीय फरकदेखील आहे. यावेळी मात्र आफ्रिका खंडाशी कोणताही ठळक संबंध नसताना युरोप आणि अमेरिकेत या आजाराचे रुग्ण आढळताना दिसत आहेत, हे यावेळच्या मंकी पॉक्स उद्रेकाचे वैशिष्टय़ आहे. आफ्रिकेशी कोणतेही कनेक्शन नसताना हा आजार जगभरात पसरताना दिसतो आहे.

मंकी पॉक्स आजाराचे स्वरूप ः

मंकी पॉक्स हा विषाणूजन्य आजार आहे. हा पूर्वीच्या स्मॉल पॉक्स म्हणजे देवी आजाराचा सौम्य प्रकार आहे. यामध्ये रुग्णाला कातडीवर पुरळ, पह्ड येणे, ताप, कान, मान, काख, जांघ या ठिकाणच्या लसिका ग्रंथींना सूज येणे, अंगदुखी, स्नायुदुखी, थकवा अशी लक्षणे आढळतात. हा आजार तसा सौम्य स्वरूपाचा आहे. बहुसंख्य रुग्ण तीन- चार आठवडय़ांत बरे होतात. तथापि काही रुग्णांमध्ये गुंतागुंत होऊ शकते. अंधुक दिसणे किंवा दृष्टी जाणे, मेंदूला संसर्ग होऊन झटके येणे, किडनी संसर्गित झाल्याने लघवीचे प्रमाण कमी होणे अशी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

मंकी पॉक्स आजाराचा प्रसार ः

मंकी पॉक्स या आजाराच्या प्रसाराचा वेग कोविड किंवा स्वाईन फ्लू आजाराच्या तुलनेत अगदी मंद आहे. त्यामुळे या आजाराच्या तुलनेत मंकी पॉक्स रुग्णसंख्येत फार मोठी वाढ होण्याची शक्यता नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. अगदी निकट संपर्क असल्याशिवाय मंकी पॉक्स एकापासून दुसऱयाला होत नाही.

रुग्णाची काळजी घेताना पीपीईसारखी आवश्यक सुरक्षा साधने न वापरता रुग्ण शुश्रूषा केल्याने डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, कुटुंबीय यांना हा आजार होऊ शकतो.

रुग्णाचा शारीरिक संपर्क येणे, रुग्णाच्या शरीरावरील पह्डातील द्रवाचा संपर्क येणे, विशेषतः लैंगिक संपर्क हे आजार प्रसाराचे महत्त्वाचे कारण आहे. सध्या युरोपात समलिंगी संबंध असणाऱया पुरुषांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो आहे. रुग्णाचे कपडे, अंथरुण पांघरुण यांच्याशी संपर्क आल्यानेदेखील या आजाराचा प्रसार होऊ शकतो.

हा आजार विषाणूजन्य आहे आणि त्याच्यावरील कोणतेही औषध सध्या तरी उपलब्ध नाही. तथापि लक्षणांनुसार उपचार करून बहुसंख्य रुग्ण बरे होतात. संशयित आणि बाधित रुग्णाचे वेळेवर विलगीकरण, हातांची स्वच्छता, रुग्ण उपचार करताना घ्यावयाची खबरदारी, रुग्णाचे कपडे आणि त्याने वापरलेल्या वस्तू योग्य दक्षता घेऊन हाताळणे, पह्डातील द्रवाशी संपर्क टाळणे अशी काळजी मंकी पॉक्सचा प्रसार होऊ नये यासाठी आवश्यक आहे. याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि कम्युनिटीमध्येदेखील सर्वेक्षण सुरू आहे. या आजाराचा प्रसार आपल्याकडे होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

2009 ते 2022 या कालावधीतील म्हणजे अवघ्या 13 वर्षांतील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील मंकी पॉक्स ही सातवी आंतरराष्ट्रीय आणीबाणी! म्हणजे जवळपास दर दोन वर्षांनी एक आणीबाणी इतके हे प्रमाण काळजी वाटावे एवढे अधिक आहे.

2009 पासून स्वाईन फ्लू, इबोला, पोलिओ, झिका आणि कोविड अशा अनेक आजारांची आणीबाणी आपण पाहिली आहे. इबोलासंदर्भातील आणीबाणी दोनवेळा जाहीर झाली आहे.

ही सारी परिस्थिती आपल्याला आपण सार्वजनिक आरोग्य क्षेत्राकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची निकड स्पष्ट करते. जागतिकीकरण आणि शहरीकरण या दोन घटकांमुळे नवनवीन आजार आपल्या भेटीला येत असताना सार्वजनिक आरोग्य हा आपला पहिल्या बाकावरील विषय आहे हे आपण समजावून घेण्याची गरज आहे. ‘शाश्वत विकास’, ‘क्लायमेट चेंज’ हे शब्द निव्वळ भाषण आणि चर्चेपुरते राहू नयेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सार्वजनिक आरोग्याचा कॉमन मिनिमम अजेंडा ठरवून त्यानुसार वाटचाल करण्याची ही वेळ आहे. तुमचे माझे आरोग्य ही बाजारपेठेतील चकाकती कमोडिटी होऊ नये यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करावे लागतील. रोज नव्याने येणाऱया आरोग्य क्षेत्रातील आणीबाणीचा हाच नेमका अर्थ आहे. आरोग्य क्षेत्रातील आणीबाणी आपला जगण्याचा, अस्तित्वाचा मूलभूत हक्कच हिरावून घेते हे उमजले तर या आणीबाणीचे गांभीर्यदेखील आपल्याला नक्की कळेल.

(लेखक एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्राचे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत)