
>> मंगेश उदगीरकर
किती साध्या शब्दात नारायण त्याच्या जगण्याचं सार सांगायचा. इतकं सरळ जगता येतं? मला प्रश्न पडला होता. इतके दिवस मी स्वतःला सरळ साधा समजत होतो. माझा हा आत्मभिमान याने एका टिचकीत कोलमडवून टाकला होता. माझा हा सरळपणा किती वाकडा आहे याची जाणीव नकळतपणे त्याने करून दिली.
माझ्यासमोर तो उभा होता. त्याचा मिस्किल, हसरा चेहरा पाहून मलाही हसू फुटलं आणि तो माझ्या अंतरंगातल्या मित्रांमध्ये एका क्षणात सामील झाला तो आजतागायत! सडसडीत बांधा, बऱयापैकी उंची, कपाळावर झेपावलेल्या केसांच्या बटा. सरळ नाकाखाली मिशांचे एक बारीक पिरामिड. पसरट जिवणी. थोडक्यात, जॉनीवॉकर! या सद्गृहस्थाला मी कधीच उदास पाहिलं नाही. चेहऱयावर कायम खोडकर, पण निर्मळ हास्य पसरलेलं. मला याचा नेहमीच हेवा वाटत आलाय. आता हा काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता का? हासुद्धा माझ्यासारखाच मध्यमवर्गीय घरातून आलेला. पण काळज्या, चिंता, वाटय़ाला आलेल्या माझ्या कपाळावर आठय़ांचे जाळे पसरलेले आणि याचे कपाळ सपाट का? हा मला अजूनही छळत आलेला प्रश्न आहे. मला समस्या दाभणासारख्या टोचत असतात आणि याला त्याच समस्या गुदगुल्या करीत असतात की काय? एखाद्या गंभीर प्रसंगात हा हसत हसत माझी समजूत काढत असतो.
‘ए मालक! जाऊ दे ना यार! एवढं काय मनावर घेतोस? दोन दिवसात ओक्के होऊन जाईल काय?’
थोडक्यात, चिंता करण्यात आमचे आयुष्य चालले आहे आणि हा त्याच चिंता फुंकर घालून उडवणार!
एक अपवाद सोडला तर आम्ही कधी एकत्र काम केलं नाही. पण आम्ही कोणत्याही शाखेत असलो तरी संपर्क राहायचा. याचा फोन नेहमी रात्री अकराच्या पुढे!
‘मालक! काय करायलास? अरे! ही काय झोपायची वेळ आहे? बाहेर पहा! कसं मस्त चांदणं पसरलंय!’
‘च्यायला, वैताग आहे! आता गरळ ओक लवकर!’ मग त्याची चर्पटपंजरी सुरू व्हायची. मग एक तासभर त्याची दैनंदिनी, ऑफिसात काय घडलं, याचा गोषवारा देऊन तो झोपायचा आणि मी नंतर टक्क जागा! मला अख्खी बँक मालक म्हणून संबोधायची म्हणून मी याचा मालक!
नारायण प्रचंड खटपटी माणूस! त्याने उचापत्या करून कानाने अधू असल्याचे शासकीय प्रमाणपत्र मिळवले होते. कसे ते त्यालाच ठाऊक!
एखाद्या हॉटेलमध्ये बसल्यावर एरव्ही आपल्याकडे दुर्लक्ष करणारे, उपकार केल्यासारखे वागणाऱया वेटर्सना हा ‘ए नाम्या, भडव्या कुणीकडे लक्षय बे?’ वगैरे बिनदिक्कत बोलून जातो आणि तोही लाचारासारखा ‘काय चुकलं का साहेब?’ म्हणतो, तेव्हा याचा मत्सर तर वाटतोच, पण माझी मलाच दया येऊन जाते. याच्या आईला मी जेव्हा भेटलो तेव्हा त्याच्या या सदाहरित स्वभावाचा उलगडा झाला. हा मिस्किल तर ती दहा मिस्किल! तिची पेन्शन त्याच्याच शाखेत! ती पेन्शन घ्यायला बँकेत यायची ती थेट मध्ये यायची. ती दिसली की हा ओरडायचा, ‘या म्हातारीला कोणी मध्ये सोडलं रे?’ म्हातारी खुदूखुदू हसायची आणि त्याच्या दुप्पट आवाजात दम द्यायची, ‘तुला मी म्हातारी वाटले काय रे थेरडय़ा!’ सगळी बँक हसायची. मग हळूच आईजवळ यायचा, ‘आई! कशाला त्रास घेतेस? मी आणली असती ना पेन्शन!’
‘मेल्या! तुझा काय भरवसा? पेन्शन संपवूनच घरी यायचास!’ असं म्हणून त्याच्या हाती शंभराची नोट ठेवायची!
तीस-बत्तीस वर्षे एकाच ठिकाणी काम करून मी थोडा वैतागलो होतो. मला थोडा बदल हवासा वाटू लागला होता. म्हणून मी वरिष्ठांना गळ घातली. तेही तयार झाले. त्यावेळी नारायण एका खेडय़ातल्या शाखेत शाखाधिकारी होता.
योगायोगाने मी त्याच्या शाखेत रुजू झालो आणि सर्व्हिस विथ स्माइल काय प्रकार असतो तो मला तिथे पाहायला मिळाला. याच्या केबिनमध्ये कस्टमर आणि त्याचे संवाद आणि खिदळणे कायम चालू असायचे.
एखादे वेळी मी त्याला समजावायचो, ‘नारायण! अरे असं आघळपघळ बोलणं वागणं सोड मित्रा, कधीतरी गंभीरपणे वागत जा! गोत्यात येशील!’
‘मालक! मी वाईट बोलतो का? वाईट करतो का? माझं आत्तापर्यंत कधी वाईट झालय का? आणि समजा एवढय़ावरही काही घडलंच तर आपलं हसणं कामाला येईल की नाही?’
त्याच्या या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते. किती साध्या शब्दात त्याने त्याच्या जगण्याचे सार संगितले होते! इतकं सरळ जगता येतं? मला प्रश्न पडला होता. इतके दिवस मी स्वतःला सरळ साधा समजत होतो. माझा हा आत्मभिमान याने एका टिचकीत कोलमडवून टाकला होता. माझा हा सरळपणा किती वाकडा आहे याची जाणीव नकळतपणे त्याने करून दिली होती. थोडा सावध होऊन मी फोन उचलला, ‘काय नाऱया? भडव्या काय चाललंय? उद्या बसायचं का बे?’
‘आयला! मालक? सुधारलास की काय बे साल्या?’
तिकडे तो हसत होता आणि इकडे मी त्याचे हसणे कानात साठवून घेत होतो!




























































