
>> माधव गवाणकर
विद्यार्थ्यांना निसर्गसृष्टीबद्दलचे कुतूहल, आस्था वाटू लागेल अशा प्रकारची छोटेखानी पुस्तके ही आजकालची गरज आहे. छोटे आणि रंजक पुस्तक ‘जंगलाची दुनिया’ तुमच्या मुलांना, नातवंडांना नक्कीच आवडेल. एका बैठकीत वाचन संपवता येईल, अशी ही पुस्तिका अरण्यस्वामी मारुती चितमपल्ली यांनी लिहिली आहे हे विशेष.
विषयतज्ञ म्हणून चितमपल्लींचा असलेला अनुभव या पुस्तकातही जाणवतो. जंगलात फिरताना उजेडाचे कवडसे पडतात व छान वाटते तसे हे लेख आहेत. पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने विषयप्रभू चितमपल्लींनी दिलेल्या टिप्स तर `Which isit’ या इंग्रजी सूत्राने बांधलेल्या आहेत. जॉर्ज शेल्लरसारख्या अभ्यासकाची पुस्तकात आलेली विधाने या पुस्तिकेला थोडी अधिक उंची देतात. ‘सगरी’ (येण्या-जाण्याच्या वाटा)सारखे नवे शब्दही शहरी वाचकांना या जंगली दुनियेत फिरताना कळतात.
श्रद्धेचा सुगंध या अनुभव कथनात आपोआप येतो. आदिवासी तर वाघाची देव म्हणून पूजा करतात. या पुस्तकात गूढ, अद्भुत वाटावेत असेही काही अंश आहेत. उदा. मध्यरात्री ज्याच्याकडे वाघ येतो असा फकीर! जंगली प्राणी वश होतात असे त्यातून सूचित होते.
‘पक्षी जाय दिगंतरा’ हा तर सुरेख वृत्तपत्रीय ललित लेख वाटतो. ‘कुबडा माळी’ या प्रकरणात तर वृक्षसंवर्धनाबद्दल बोलता बोलता मानवतेच्या संवर्धनाकडे विषय सोप्या पद्धतीने वळवला आहे.
‘मनोली-एक पाऊस’ हा लेखकरावांचा स्वानुभव हरिणीचे पाडस व लेखकाची मुलगी यांच्यातील भावबंध अगदी मोजक्या नेमक्या शब्दांत मांडतो. दिलेले प्रेम प्राणी लक्षात ठेवतात हे सत्य वाचकांनाही सुखावणारे आहे.
लेखक चितमपल्ली हे मुळात जपानी तत्त्वज्ञ, ऋषी असतो तसे व्यक्तिमत्त्व आहे. ‘आज्ञापालन म्हणजे जीवन’सारखे वाक्य त्यांच्या या पुस्तकात तत्त्वज्ञानाला चटकन स्पर्श करते. ‘विलो वाईफ’ या छोटय़ा कथेतील हितारो, त्याची बायको व विलो झाड या पात्रांची कहाणी पुन्हा गूढ वाटते. निसर्गातील रहस्यांची चितमपल्लींना, त्यांच्या काव्य जगणाऱया वनवासी मनाला आवडून असावी. निसर्गाच्या पलीकडे अंतिम, शाश्वत दिव्य काय आहे? असा प्रश्न चितमपल्लींचे हे पुस्तक उपस्थित करते.
‘टिबुकली’ या सरस लेखात तर चित्रकाराने रंगीत चित्र काढावे तसे लेखकाने शब्दचित्र रेखाटले आहे. त्यात पाखरांमधील कौटुंबिकता ‘मोठी झालेली पिलं आपल्या भावंडांची काळजी घेत’ अशा गोड रूपात येते. शाळा, ज्युनियर कॉलेजच्या लायब्ररीत मुद्दाम ठेवावे, वाचायला द्यावे असे हे पुस्तक म्हणजे चितमपल्लींकडे अनुभवांतून आलेला ज्ञानाचा सागर आहे त्याची झलक ठरते वळतील आणि वाचनाची खात्री वाटते!
‘जंगलाची दुनिया’
लेखक ः मारुती चितमपल्ली
प्रकाशक ः ‘साहित्य प्रसार केंद्र’, नागपूर
मूल्य ः रुपये 50/-




























































